पन्नास दिवसांनंतरही एटीएम ‘कॅशलेस’

मुनेश्‍वर कुकडे
बुधवार, 4 जानेवारी 2017

गोंदिया - हजार व पाचशे रुपयांच्या नोटाबंदीनंतर, पन्नास दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर येईल, असे शासनाकडून सांगण्यात आले. परंतु, हा कालखंड लोटला तरी, अजूनही कॅश तुटवडा कायम आहे. एटीएममधून दोन ते अडीच हजारांव्यतिरिक्त रक्कम मिळत नाही. त्यामुळे सगळीकडे नाराजीचा सूर आहे. नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. 

गोंदिया - हजार व पाचशे रुपयांच्या नोटाबंदीनंतर, पन्नास दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर येईल, असे शासनाकडून सांगण्यात आले. परंतु, हा कालखंड लोटला तरी, अजूनही कॅश तुटवडा कायम आहे. एटीएममधून दोन ते अडीच हजारांव्यतिरिक्त रक्कम मिळत नाही. त्यामुळे सगळीकडे नाराजीचा सूर आहे. नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. 
हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा ८ नोव्हेंबरपासून चलनातून बंद करण्यात आल्या. त्यानंतर अल्पावधीत दोन हजार व पाचशे रुपयांची नोट व्यवहारात आली. दोन हजार रुपयांच्या चिल्लरकरिता आजही अनेकांची तारांबळ उडत आहे. दरम्यान, नोव्हेंबर ते डिसेंबर या दोन महिन्यांत खरिपातील धान निघाले. हे धान विक्रीकरिता शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमध्ये नेले. परंतु, बाजार समित्यांतील व्यापारी धनादेश देत असल्याने बॅंकेत धनादेश वटविण्याकरिता  अडचण निर्माण होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. धान विकूनही खर्चासाठी पैसा नाही, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. उल्लेखनीय म्हणजे, अनेक शेतकऱ्यांचे स्वत:चे बॅंकेत खाते नाही. मात्र, शेतकऱ्यांना धनादेश मिळत असल्याने बॅंकेचे खाते  काढण्यासाठी येरझारा माराव्या लागत आहेत.

नोटांचा तुटवडा भासत असल्याने शेतकऱ्यांची बहुतांश कामे ठप्प पडली आहेत. उपवर मुलामुलींचे लग्न जुळविण्याच्या कामाला या महिन्यात गती येते. परंतु, पैसाच हाती नसल्याने हे कार्यदेखील पुढे ढकलण्यात येत आहे. एटीएममधून केवळ दोन ते अडीच हजार रुपयेच मिळत असल्याने अनेक समस्या नागरिकांसमोर उभ्या आहेत. ग्रामीण भागालासुद्धा नोटाबंदीचा फटका बसला आहे. लहान दुकानदारापासून मोठ्या  व्यापाऱ्यापर्यंत सर्वांनाच नोटाबंदीचा फटका बसला आहे. पैसे नसल्याने अनेकांचे व्यवहार ठप्प पडले आहेत. सध्या सगळीकडे खरेदी-विक्री सुरू असल्याने नगदी रक्कम मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसह शेतकरी त्रस्त आहेत.

शेतकरी त्रस्त
गोंदिया जिल्ह्यात धानपीक निघणे सुरू झाले आहे. शेतकरी कर्ज घेऊन शेती करीत असल्याने त्यांना सावकाराचे किंवा बॅंकांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी लागलीच धान विकावे लागतात. यावर्षी नोटाबंदीमुळे धान खरेदी करण्यास व्यापारी नकार देत आहे. दुसरीकडे जे व्यापारी धान खरेदी करीत आहेत ते पैसे देण्यास वेळ मागत आहे. दोन ते तीन महिन्यांचा वेळ हे व्यापारी  मागत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे. ज्या शेतकऱ्यांना नगदी रोकड हवी असते त्यांचे धान अत्यंत कमी भावात विकावे लागत आहेत.
 

रकमेचा धनादेश हातात येतो. परंतु, धनादेश वटविण्याकरिता सात ते आठ दिवस लागत  असल्याने मध्यंतरीच्या कालावधीतील कामांचा खोळंबा होतो. त्यामुळे एटीएममधून रोख रक्कम काढण्याची मर्यादा वाढवावी
- सरयू बिसेन रेंगेपार.

५० दिवसांनंतरही नोटाबंदीचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांना त्यांनी विकलेल्या धानाचा मोबदला म्हणून रोख रक्कम न देता धनादेश देण्यात येते. त्यामुळे वेळेत होणारी कामे लांबणीवर जातात. शासनाने दोन हजार रुपयांव्यरिक्त हजार रुपयांच्या नोटा चलनात आणाव्यात. 
- चंद्रकांत मरस्कोल्हे, शिकारीटोला, पांढरी.

किरकोळ व्यापारीही अडचणीत
नोटाबंदीचा परिणाम किरकोळ व्यापाऱ्यांवरही झाला आहे. अगदी तोकडी रक्‍कम बॅंकेतून मिळत असल्याने ग्राहक खरेदीपासून चारहात लांब राहत असल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर चिल्लरचा तुटवडा व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. नोटाबंदीचा दुष्परिणाम दिसू लागल्याची ओरड आता सुरू झाली आहे.

Web Title: atm cashless