यवतमाळ जिल्ह्यात वाळू माफिया झाले सैराट... थेट तलाठ्यावरच चढवला हल्ला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

महागाव तालुक्‍यातील फुलसांवगी येथून उमरखेडमधील चुरमुरा येथे दोन ट्रॅक्‍टर चोरीची वाळू घेऊन येत होते. तलाठी गजानन सुरोशे, पंजाब सानप यांनी चुरमुरा येथे ट्रॅक्‍टर अडवले. विचारपूस करीत असताना ट्रॅक्‍टर मालक मुजमिलखान याने सुरोशे, सानप यांच्यावर हल्ला चढविला.

उमरखेड (जि. यवतमाळ) : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या दोन तलाठ्यांवर वाळू माफियांनी हल्ला केला. सानप यांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थ मदतीला धावून आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना शुक्रवारी (ता.22) रात्री पाऊने दहा वाजतादरम्यान चुरमुरा गावाजवळ घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, महागाव तालुक्‍यातील फुलसांवगी येथून उमरखेडमधील चुरमुरा येथे दोन ट्रॅक्‍टर चोरीची वाळू घेऊन येत होते. तलाठी गजानन सुरोशे, पंजाब सानप यांनी चुरमुरा येथे ट्रॅक्‍टर अडवले. विचारपूस करीत असताना ट्रॅक्‍टर मालक मुजमिलखान याने सुरोशे, सानप यांच्यावर हल्ला चढविला. तलाठ्यांनी आरडाओरड करताच चुरमुरा येथील एक होमगार्ड व गावकरी धावत रस्त्यावर आले. तोपर्यंत वाळू खाली करून ट्रॅक्‍टर चालकाने पळ काढला. 

नागरिक मदतीला धावल्याने अनर्थ टळला
माहिती मिळाल्यावर अर्ध्या तासाने नायब तहसीलदार राणे, मंडल अधिकारी पंडीत, शिरभाते घटनास्थळी दाखल झाले. दुसऱ्या ट्रॅक्‍टरला जप्त करून तहसील कार्यालयात आणण्यात आले. चालक बबलू उर्फ अजीम इशाखान यास अटक करण्यात आली. या प्रकरणात तलाठी सानप यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून मुजामिल खान, बबलू उर्फ अजिम इशाखान पठाण, संदीप आडे (रा. फुलसावंगी) यांच्याविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास ठाणेदार मोतीराम बोडखे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पांचाळ करीत आहेत.

जंगलात झोपून काढावे लागताहेत दिवस... ऐका नागपुरातील पोलिसाची व्यथा

हल्ल्याची माहिती तलाठी सुरोशे यांनी वरिष्ठांना फोनद्वारे दिली. मुख्यालयापासून घटनास्थळाचे अंतर पाच किलोमिटर असताना तहसीलची गाडी यायला अर्धा तास लागला. त्यामुळे ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attack on talathi at yavatmal district