पोलिस गेले कारवाई करण्यासाठी अन्‌ करावा लागला 'या' गोष्टीचा सामना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 February 2020

दुसरा ट्रॅक्‍टर मंगेश बाबुराव प्रजापती राहणार विहीगाव याचा असून, तो स्वतः चालवित होता तर तिसरा ट्रॅक्‍टर अयुब युसूफ सौदागर राहणार विहीगाव याचा असून, त्यावर चालक सौदागर होता. पाठीमागे दुचाकीद्वारे रवींद्र गावंडे व चेतन बावने पळत ठेवणारे होते, अशी माहिती पोलिसांनी सांगितले. 

अंजनगावसुर्जी-वनोजाबाग (जि. अमरावती) : अंजनगाव तालुक्‍यात वाळू चोरीचे थैमान सुरू असल्याचे "सकाळ'ने शुक्रवारच्या (ता. 14) अंकात वृत्त प्रकाशित करताच चिंचोली रहीमापूर पोलिसांनी विहीगाव येथील शहानूर नदीघाटात मोठी कारवाई केली. मात्र, ट्रॅक्‍टर चालकांनी पोलिसांच्या अंगावर वाहन नेण्याचा प्रयत्न केल्याने चांगलीच खळबळ उडाली. 

अंजनगावसुर्जी तालुक्‍यातील रहीमापूर पोलिस ठाणाच्या हद्दीत विहीगावात नदी व नाल्यातून अवैद्य वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच शुक्रवारी (ता. 14) रहीमापूर पोलिसांनी विहीगाव खल्लार रस्त्यावर स्मशानभूमी जवळ नाकाबंदी केली. सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास वाळूने भरलेले चार ट्रॅक्‍टर विहीगाव गावाकडून कापूसतळणीकडे जाताना पोलिसांना दिसले. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ट्रॅक्‍टर पोलिसांच्या अंगावर टाकून भरधाव वेगाने पळवून नेले. 

अधिक माहितीसाठी -  प्यार मे जियेंगे मर जायेंगे... प्रेमकहाणीचा करुण अंत!

मात्र, एका ट्रॅक्‍टरला पोलिसांनी जागीच पकडले. पळालेल्या तीन ट्रॅक्‍टरचा पोलिसांनी पाठलाग केला असता तस्करांनी ट्रॅक्‍टर पळवायला सुरुवात केली. खासगी वाहनाने पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता तिन्ही ट्रॅक्‍टर विहीगाव ते कापुसतळणी रोडवर रेल्वेलाईनच्या रस्त्याने पळत सुटले. त्यापैकी एका ट्रॅक्‍टरचालकाने ट्रॅक्‍टरमधील वाळू धावत्या अवस्थेतच खाली केली. 

ताब्यात घेतलेल्या ट्रॅक्‍टर चालकाचे नाव अनुप अशोक भांबुरकर असे आहे. पोलिसांनी दोन लाख रुपये किमतीचा विनानंबरचा ट्रॅक्‍टर, ट्रॉली अंदाजे किंमत एक लाख व एक ब्रास वाळू असा एकूण तीन लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अशोक भांबुरकरला विचारणा केली असता हा ट्रॅक्‍टर रवींद्र माणिक गावंडे यांच्या मालकीचा असून, चालक शेख इरफान मुर्हा येथील राहणार आहे. 

दुसरा ट्रॅक्‍टर मंगेश बाबुराव प्रजापती राहणार विहीगाव याचा असून, तो स्वतः चालवित होता तर तिसरा ट्रॅक्‍टर अयुब युसूफ सौदागर राहणार विहीगाव याचा असून, त्यावर चालक सौदागर होता. पाठीमागे दुचाकीद्वारे रवींद्र गावंडे व चेतन बावने पळत ठेवणारे होते, अशी माहिती पोलिसांनी सांगितले. 

जाणून घ्या -  किळसवाणा प्रकार! मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींवर केला अत्याचार, संतप्त नागरिक उतरले रस्त्यावर

विहीगाव शिवारातून शहानूर नदीपात्रातून उत्खनन करून ही वाळू नेण्यात येत होती. त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगण्यात आले. यातील अनुप अशोक भांबुरकर, रवींद्र माणिकराव गावंडे, शेख इरफान, मंगेश बाबाराव प्रजापती, सौदागर, चेतन बाळकृष्ण बावणे यांनी शहानूर नदीतून वाळूचे विनापरवाना उत्खनन केले. सोबतच कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्‍टर नेल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सर्वांना ताब्यात घेऊ 
विहीगाव ते खल्लार रस्त्यावर स्मशानभूमी जवळून चार ट्रॅक्‍टर वाळू घेऊन जात असताना आढळले. त्यांना आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी ट्रॅक्‍टर आमच्या अंगावर आणले. आम्ही त्यांचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुसाट पाळण्याचा प्रयत्न केला. एक ट्रॅक्‍टर आम्ही पकडण्यात यशस्वी ठरलो. उर्वरित तिघांची माहिती मिळाली आहे. सर्वांना ताब्यात घेण्यात येईल. 
- जमील शेख, 
ठाणेदार, राहीमापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempts to mount tractors on police in Amravati