रिझर्व्ह बॅंकेला लुटण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

नागपूर : मोठमोठ्या कंपन्या बंद पडत आहेत. बेरोजगारीच्या संख्येत वाढ झाली आहे. शेतकरी, मजूर यांच्याजवळ पैसा राहिला नाही. देशावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. याचा फटका देशाच्या सुरक्षेलाही बसणार आहे. आपत्कालीन स्थितीत रिझर्व्ह बॅंकेकडे जमा असलेल्या निधीचा वापर करून बॅंकेला लुटण्याचे सरकारचे धोरण असल्याची टीका ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे राष्ट्रीय महासचिव देवब्रत विश्‍वास यांनी केली.

ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी श्रीकांत तरार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा पदग्रहण सोहळा शनिवारी देशपांडे सभागृहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अथिती व अध्यक्ष म्हणून देवब्रत विश्‍वास उपस्थित होते. विश्‍वास यांनी सरकारच्या आर्थिक धोरणावर टीका केली. ते म्हणाले, देशाची आर्थिक अवस्था अतिशय बिकट झाली आहे. देशावर वाढलेल्या कर्जामुळे प्रत्येक नागरिक कर्जदार झाला आहे. आर्थिक व्यवस्था ढासळत चालली आहे. आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांची गरज आहे. नेताजींनी फॉरवर्ड ब्लॉकची बांधणी करताना जशी समाजातील वेगवेगळ्या घटकातील लोकांना एकत्र करून, इंग्रजांशी लढा दिला होता. त्या लढ्याची आज गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी बोलताना श्रीकांत तरार म्हणाले की, भाऊ जांबुवंतराव धोटे यांनी महाराष्ट्रात फॉरवर्ड ब्लॉकची बांधणी केली. ही जबाबदारी आता माझ्यावर आली आहे. फॉरवर्ड ब्लॉकच्या माध्यमातून आता विदर्भाच्या चळवळीला बळ मिळणार असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश सचिव रामेश्‍वर चोंडा, अहमद कादर, सुनील चोखारे, चंद्रशेखर अरगुलेवार, देवीदास पेटारे, संजीवन वालदे, सुलभा चोखारे, विजया एस. धोटे, विलास चोपडे, कृष्णकांत मोहोड, राजू प्रधान, सिद्धार्थ इंगळे, ओंकार गुलवाडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक गजानन अहमदाबादकर यांनी केले. संचालन प्रवीण राऊत यांनी केले. आभार सुनील चोखारे यांनी मानले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempts to rob the Reserve Bank