रिपब्लिकन नेत्यांना 31 ऑगस्टचा अल्टिमेटम

रिपब्लिकन नेत्यांना 31 ऑगस्टचा अल्टिमेटम


नागपूर : पन्नास वर्षांपासून रिपब्लिकन नेते सत्तेसाठी कधी कॉंग्रेस तर कधी भाजपच्या दारावर उभे असतात. हा एकूणच आंबेडकरी समाजाचा अपमान आहे. या नेत्यांनी आंबेडकरी समाजाला वेड्यांच्या पंक्तीत बसवले. या नेत्यांचे वर्तन आता खपवून न घेता त्यांच्या या समाजद्रोहाविरुद्ध आंबेडकरी कार्यकर्ते उठाव करणार आहेत. शनिवारी (ता. 10) आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या सभेत "खूप लढलो बेकीने, आता लढूया एकीने' अभियान सुरू करणाऱ्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन नेत्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते, परंतु या नेत्यांनी पाठ फिरवली. यामुळे 31 ऑगस्टपर्यंत या नेत्यांना आजच्या खच्चून भरलेल्या सभागृहात रिपब्लिकन जनतेच्या उपस्थितीत अल्टिमेटम देण्यात आला.
साठ वर्षांपूर्वी रिपब्लिकन शक्ती होती. परंतु या नेत्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे पक्ष गटातटांत विखुरला. समाजाचे आंदोलन संपत असल्याने संकटांना तोंड देण्याची वेळ आली. समाजाचे शोषण सुरू झाले. ही बाब लक्षात घेत शंभर कार्यकर्त्यांच्या फळीने "खूप लढलो बेकीने, आता लढूया एकीने' अभियान सुरू केले. या अभियानाअंतर्गत शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात समाजाच्या एकीचे बळ दिसले. नागभूमीतून राज्यभरात हा संदेश पोहचला. या अभियानातील कार्यकर्त्यांनी सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यापासून तर वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, रिपाइंचे डॉ. राजेंद्र गवई यांच्यासहित सर्वच दुसऱ्या फळीतील नेत्यांचीही भेट घेतली, परंतु शनिवारच्या सभेत एकही रिपब्लिकन नेता उपस्थित नव्हता. यामुळे संतप्त समाजाने या अभियानातून नेत्यांना 31 ऑगस्टपर्यंत आपल्या भूमिका स्पष्ट करा, अन्यथा कार्यकर्त्यांच्या उठावाला सामोरे जा, असा इशारा दिला.
सभेत रमेश पिसे, कैलास खोब्रागडे, प्रवीण वानखेडे, अतुल खोब्रागडे, प्रवीण गजभिये, पवन मेश्राम, प्रवीण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिमा कोचे, सिद्धार्थ मेश्राम, मंगेश नागदिवे, मनोज गजभिये, प्रदीप भरणे, शुभम बावनगडे, रोशन जांभुळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रिपाइं नेत्यांना आव्हान दिले. संचालन वैशाली गोस्वामी यांनी केले. तर दीपांकर दुपारे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com