ऑटोचालकाचा सुपारीने गेम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

नागपूर - नंदनवनमधील ऑटोचालक लिकेश विजय साठवणे (वय 27) या युवकाचा सुपारी देऊन खून केला. त्याचा मृतदेह भांडेवाडीतील एका विहिरीत फेकून दिला. या हत्याकांडाचा छडा नंदनवन पोलिसांनी लावला असून एका आरोपीला अटक केली. गोपाल उर्फ गुड्‌डू बिसेन असे आरोपी युवकाचे नाव आहे. 

नागपूर - नंदनवनमधील ऑटोचालक लिकेश विजय साठवणे (वय 27) या युवकाचा सुपारी देऊन खून केला. त्याचा मृतदेह भांडेवाडीतील एका विहिरीत फेकून दिला. या हत्याकांडाचा छडा नंदनवन पोलिसांनी लावला असून एका आरोपीला अटक केली. गोपाल उर्फ गुड्‌डू बिसेन असे आरोपी युवकाचे नाव आहे. 

लिकेश साठवणे हा नंदनवनमध्ये ऑटो चालवीत होता. तो अविवाहित असून, आई शालूबाई आणि भाऊ राकेशसोबत राहत होता. 9 एप्रिलला सायंकाळी मोबाईल आणि पैशाचे पाकीट घरात ठेवून चौकातून येतो, असे सांगून घराबाहेर पडला. मध्यरात्रीपर्यंत तो घरी न आल्याने त्याच्या भावाने शोधाशोध केली; मात्र तो आढळून आला नाही. त्यामुळे त्यांनी नंदनवन ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्याचा सोमवारी दुपारी भांडेवाडीतील एका विहिरीत मृतदेह आढळून आला. त्याच्या नातेवाइकांनी "सुपारी किलिंग'चा आरोप केला आहे. लिकेश आणि जया अरुण शर्मा या महिलेची मैत्री होती. गेल्या दोन महिन्यांपूर्वी जयाने त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात संशयावरून गोपाल बिसेन आणि प्रफुल्ल गेडाम याने साथीदाराच्या मदतीने लिकेशचे अपहरण करून त्याचा खून केला. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी गोपाल बिसेनला अटक केली असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. 

दबा धरून केला "गेम' 
लिकेश साठवणे (पवनशक्‍तीनगर, वाठोडा) याला 9 एप्रिलला रात्री आठ वाजता गोपालने बोलावले. त्याला दुचाकीवर बसवून भांडेवाडीत नेले. तेथे प्रफुल्ल गेडाम आणि त्यांचे साथीदार दबा धरून बसले होते. आरोपींनी गोपालला मारहाण करण्यास सुरू केली. मात्र, धष्टपुष्ट असलेला लिकेश भारी पडला. त्यामुळे आरोपींनी लिकेशच्या पोटात चाकू खुपसला. जमिनीवर कोसळल्यानंतर त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचा चेहरा दगडाने ठेचला. मृतदेह विहिरीत फेकून आरोपींनी पळ काढला. 

असा झाला भंडाफोड... 
लिकेश हरवल्याची तक्रार प्राप्त झाल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. एपीआय शेजूळ यांनी संशयावरून गोपालला ताब्यात घेतले. गोपालने आढेवेढे घेत पोलिसांना "मामा' बनवले. मात्र, त्याला खाक्‍या दाखवताच पोपटासारखा बोलू लागला. त्याने लिकेशचा खून केल्याची कबुली दिली. त्यासाठी जया शर्मा या महिलेकडून 50 हजार रुपयांची सुपारी घेतली. त्यापैकी 35 हजार रोख घेतले, तर 15 हजार खून केल्यावर मिळाल्याची कबुली दिल्याची माहिती नंदनवन पोलिसांनी दिली. 

कोण आहे ही जया? 
जया शर्मा ही सेक्‍स रॅकेट चालवत होती. तिच्याकडे ऑटोने ग्राहक आणून देण्याचे काम लिकेश करीत होता. त्यासाठी त्याला कमिशनसुद्धा मिळत होते. लिकेश आणि जयात गेल्या दोन महिन्यांपूर्वी पैशावरून वाद झाला होता. लिकेशने तिच्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांचा छापा घालण्याची धमकीसुद्धा दिली होती. लिकेशवर नंदनवन ठाण्यात मारहाणीचे दोन गुन्हे दाखल आहेत. तसेच तो परिसरात गांजा पिण्यासाठी ओळखला जात होता, अशी माहिती नंदनवन पोलिसांनी दिली. 

Web Title: Auto driver murder

टॅग्स