एमआयडीसीत ऑटोचालकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

अमरावती/नांदगावपेठ : नांदगावपेठ येथील सावर्डी एम.आय.डी.सी. परिसरात एका कारखान्यासमोर ऑटोचालकाचा खून केला. शनिवारी (ता. 21) सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

अमरावती/नांदगावपेठ : नांदगावपेठ येथील सावर्डी एम.आय.डी.सी. परिसरात एका कारखान्यासमोर ऑटोचालकाचा खून केला. शनिवारी (ता. 21) सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
सागर सरदारसिंग ठाकुर (वय 40 रा. नांदगावपेठ) असे मृत ऑटोचालकाचे नाव आहे. अमोल विश्वनाथ वानरे (वय 38 रा. छायाकॉलनी, अमरावती) असे खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सागर हा व्यवसायाने ऑटोचालक असून, शुक्रवारी (ता. 20) मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास तो एमएच 27 बीडब्ल्यु 2958 क्रमांकाच्या ऑटोसह नांदगावपेठ येथील बसस्थांब्याजवळ उभा होता. मध्यरात्रीनंतरची वेळ असतांना, अमोल वानरे याला झीरो पॉइंटजवळ असलेल्या फॅक्‍ट्रीमध्ये जायचे असल्यामुळे तो सागरच्या ऑटोमध्ये बसला. नांदगावपेठ थांब्यापासून तर, फॅक्‍ट्रीमध्ये नेऊन सोडण्यासाठी दीडशे रुपये भाडे देण्याचेही निश्‍चित झाले होते. घटनेच्या वेळी ऑटोमध्ये दुसराही एक प्रवासी होता. फॅक्‍ट्रीसमोर ऑटो थांबविला असता, अमोलने थोडे दूर घेऊन चालण्याची विनंती केली. त्यासाठी ऑटोचालक सागरने अतिरीक्त पन्ना रुपये म्हणजेच एकूण दोनशे रुपयांची मागणी केली. अतिरीक्त पन्नास रुपये देण्यास अमोलने नकार दिला. त्यांच्यातील वाद पेटला. लोखंडी रॉडने अमोलने ऑटोचालक सागर ठाकूर यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर ऑटोत बसून असलेला प्रवासी व हल्ला करणारा अमोल या दोघांनी तेथून पळ काढला. सागर एका कारखान्या समोर, रस्त्यावर मृतावस्थेत पडून असल्याची माहिती फॅक्‍ट्रीमालकाने नांदगावपेठ पोलिसांना दिली. घटनेच्या वेळी ऑटोत बसून असलेला धीरज कोठार यानेही शनिवारी (ता. 21) सकाळी नांदगावपेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अमोल वानरेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ग्रामस्थांची ठाण्यावर धडक
या घटनेनंतर मारेकऱ्यांना अटक करेपर्यंत मृतदेह उचलणार नाही. या मागणीसाठी ऑटोसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी नांदगावपेठ ठाण्यावर धडक दिल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
एकापेक्षा अधिक मारेकरी
लोखंडी रॉडने सागरसिंग याच्यावर एकाने वार केल्यानंतर दुसऱ्याने दगडाने चेहरा ठेचल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. यासंदर्भात पोलिस निरीक्षक श्री. गांगुडे यांच्यासोबत संपर्क साधला असता, हल्ला एकाच व्यक्तीने केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Auto driver murdered in MIDC