वनकर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बयाणात तफावत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

पांढरकवडा (जि. यवतमाळ) - टी-१ वाघिणीचा (अवनी) खातमा करणारे पथकच चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. केंद्राची चौकशी समिती मंगळवारी (ता.१३) जिल्ह्यात  दाखल झाली. समिती सदस्यांनी अखेरच्या मोहिमेत सहभागी झालेल्या पथकातील शूटरसह कर्मचाऱ्यांचे इन कॅमेरा बयाण नोंदविले. प्रत्येकाच्या बयाणात तफावत असल्याची माहिती आहे.

पांढरकवडा (जि. यवतमाळ) - टी-१ वाघिणीचा (अवनी) खातमा करणारे पथकच चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. केंद्राची चौकशी समिती मंगळवारी (ता.१३) जिल्ह्यात  दाखल झाली. समिती सदस्यांनी अखेरच्या मोहिमेत सहभागी झालेल्या पथकातील शूटरसह कर्मचाऱ्यांचे इन कॅमेरा बयाण नोंदविले. प्रत्येकाच्या बयाणात तफावत असल्याची माहिती आहे.

टी-१ वाघिणीला शुक्रवारी, २ नोव्हेंबरला रात्री बोराटी येथील कंपार्टमेंट क्रमांक १४९ मध्ये ठार करण्यात आले. बेशुद्ध न करता थेट निशाणा साधण्यात आल्याने राजकीय नेत्यांसह वन्यजीव प्रेमींनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. या घटनेची दखल घेत चौकशीसाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणतर्फे सेवानिवृत्त अधिकारी कालेर, जोश, कामडी अशी त्रिसदस्य समिती नेमली.

बोराटी गावाजवळ जिथे वाघिणीला ठार केले, त्या तिसऱ्या पुलाजवळ पाच जणांची चौकशी करण्यात आली. शार्पशूटर नवाब शाफत अली खान यांचा मुलगा असगर अली याच्यासह  वनरक्षक शेख मुखबीर, वनपाल गोपाल केंद्रे, वनपाल दिलीप केराम, खासगी वाहनचालक  सलमान यांचा समावेश आहे.
 येथेच इन कॅमेरा बयाण नोंदविण्यात आले. वनविभागाच्या निर्देशानुसार या वाघिणीला प्रथम बेशुद्ध करण्यात आले की नाही, की थेट गोळ्या घातल्या, अशा प्रश्‍नांची सरबत्ती चौकशी समितीकडून करण्यात आली. ज्या ठिकाणी वाघिणीला ठार करण्यात आले, त्याचे प्रात्यक्षिकही करण्यात आले.

प्रत्येकाच्या बयाणात तफावत आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्राची समिती गेल्यानंतर राज्याची समिती धडकणार आहे. त्यामुळे वाघिणीच्या दहशतीतून वाघग्रस्तांची सुटका झाली, मात्र मोहीम फत्ते करणाऱ्यांचा श्‍वास आता चौकशीत अडकला आहे.

पारवा विश्रामगृहात बैठक
केंद्राची चौकशी समिती येणार असल्याची माहिती आधीच देण्यात आली होती. प्रत्येकाचे बयाण सारखे आले पाहिजे, यासाठी काळजी घेत पाचही जणांनी पारवा येथील विश्रामगृहात सकाळीच  गुप्त बैठक घेतली. मात्र, समितीने प्रश्‍नांची सरबत्ती केल्याने कर्मचारी अक्षरश: भांबावून गेले होते.

Web Title: Avani Tiger Death case Forest Employee Officer Inquiry