‘अवनी’च्या मृत्यूची चौकशी सुरू

राजकुमार भीतकर
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

यवतमाळ - टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मंगळवारी (ता. १३) राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरण समितीची चौकशी समिती दिल्लीतून यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली आहे. ज्या ठिकाणी वाघिणीला ठार केले, त्या बोराटी येथील घटनास्थळाची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती जाणून घेतली.

या पथकात कालेर, जोशी व हेमंत कांबळी या तीन सदस्यांचा समावेश आहे. ही समिती जिल्ह्यात दोन दिवस ठाण मांडून वाघीण मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे. बोराटी-राळेगाव मार्गावरील तिसऱ्या नाल्याजवळ शुक्रवारी (ता. २) वाघिणीला ठार मारले होते. त्या ठिकाणी मंगळवारी (ता. १३) समितीने भेट दिली. वाघिणीला ठार मारणाऱ्या वन विभागाच्या पथकातील सर्व सदस्यांची एकेक करून समिती चौकशी करीत आहे. प्रात्यक्षिकाद्वारे घटना नेमकी कशी घडली, याचीही माहिती जाणून घेण्यात आली. दुपारी साडेबारापासून सायंकाळी साडेपाचपर्यंत चौकशी सुरूच होती. ही समिती आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे.

राज्याची समिती येणार
टी-वन वाघिणीला ठार केल्यामुळे वन्यजीवप्रेमी व विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षासह वन विभागाला धारेवर धरले. या संदर्भात सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. राज्य सरकारनेही चौकशी समिती गठित केली. केंद्राची चौकशी समिती जिल्ह्यात आली. ही समिती परतल्यानंतर राज्याची चौकशी समिती या प्रकरणाचा आढावा घेणार आहे.

‘टी-२’ वाघाचेही ‘पगमार्क’ आढळले
वडकी - दरम्यान, राळेगाव तालुक्‍यातील सावनेर परिसरात मंगळवारी (ता. १३) दुपारी चारला शेतात कापसाची वेचणी करणाऱ्या मजुरांना ‘टी-२’ वाघाचे ‘पगमार्क’ आढळले. तसेच काही दूर अंतरावर अवनी (टी-१)चे दोन बछडेही दिसल्याची मजुरांमध्ये चर्चा आहे. अवनीला ठार मारल्यानंतर मारेगाव वनपरिक्षेत्रातील २५ गावांतील लोकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. परंतु, अवनीला ठार केल्यावरही हा प्रश्‍न सुटलेला नाही. कारण, जंगलात वाघाच्या पायांचे निशाण दिसल्यावर शेतमजूर घराकडे परत आले. त्यानंतर त्यांनी ही माहिती वन विभागाला दिली. वन विभागाने या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले. तसेच गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Avani Tiger death inquiry