घरकुल बांधकामास परवानगी देण्यास टाळाटाळ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

भिवापूर (जि.नागपूर)  : प्रत्येकाला घर' या शासनाच्या योजनेला स्थानिक नगरपंचायत प्रशासनाकडून हरताळ फासल्या जात असल्याचे चित्र आहे. घरकुल मंजुरीचे आदेश व बांधकामाकरिता आवश्‍यक असलेली मालकीची जमीन उपलब्ध असतानाही घरकुलाच्या लाभापासून वंचित ठेवल्या जात असल्याने लाभार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

भिवापूर (जि.नागपूर)  : प्रत्येकाला घर' या शासनाच्या योजनेला स्थानिक नगरपंचायत प्रशासनाकडून हरताळ फासल्या जात असल्याचे चित्र आहे. घरकुल मंजुरीचे आदेश व बांधकामाकरिता आवश्‍यक असलेली मालकीची जमीन उपलब्ध असतानाही घरकुलाच्या लाभापासून वंचित ठेवल्या जात असल्याने लाभार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 
नगरपंचायत स्थापनेच्या चार वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या गरजूंना यावर्षी शासनाकडून घरकुल मंजूर करण्यात आलेत. प्रतीक्षा यादीपैकी पहिल्या खेपेला 76 तर दुसऱ्या खेपेला 116 व्यक्‍तींना घरकुल मंजूर करून तसे आदेश न. पं. कार्यालयाला देण्यात आलेत. आदेश येऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला, परंतु न. पं. कार्यालयाच्या आडमुठ्या धोरणांमुळे आवश्‍यक असलेल्या विविध कागदपत्रांची पूर्तता करूनही अद्याप एकाही लाभार्थ्याला घरकुल बांधकामाची सुरुवात करता आलेली नाही. 
लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी आवश्‍यक असलेल्या मालकीच्या जागेसंदर्भात विविध कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना न. पं. कडून देण्यात आल्यात. त्यात भूमिअभिलेख विभागाचे आखिव पत्रिका, नकाशा तर न. पं. कार्यालयातील कर आकारणी पत्र, कर पावती आदींचा समावेश आहे. बहुतांश लाभार्थ्यांनी धावपळ करून त्यांची जुळवाजुळव केली. याकरिता काही गरीब लाभार्थ्यांना कर्जबाजारी व्हावे लागले. हे सगळे करून बांधकामाच्या परवानगीसाठी आस लावून बसलेल्यांच्या पदरी निराशा आली आहे. 
लाभार्थी ज्या जमिनीवर बांधकाम करणार आहेत, ती जमीन गावठाणात समाविष्ट असल्याचे भूमिअभिलेख कार्यालयाचे प्रमाणपत्र आवश्‍यक असल्याच्या सूना मुख्याधिकाऱ्यांकडून देण्यात आल्यात. सूचनेनुसार लाभार्थ्यांनी भूमिअभिलेख कार्यालयात धाव घेतली. परंतु, जमिनीच्या वर्गवारीचे कारण पुढे करून कार्यालयाने गावठाण प्रमाणपत्र देण्यास असमर्थता दर्शविल्याने लाभार्थ्यांत गोंधळाची स्थिती आहे. स्वमालकीच्या घराची स्वप्ने रंगवित असलेल्या लाभार्थ्यांना त्यांची स्वप्ने भंगण्याचे चित्र दिसू लागली असून त्यांच्यात कमालीची अस्वस्थता जाणवत आहे. 
दरम्यान, गरीब व गरजू लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ तातडीने मिळवून देण्यात यावा, गरज पडल्यास नियमांत शिथिलता आणावी अशी मागणी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष किरण नागरीकर यांच्याकडे केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avoid permitting the construction of homes