"गड्या लाखोंच्या ऑफरपेक्षा, बरी आपली चटणी भाकर"; ऑनलाईन प्रलोभनाबाबत ग्रामीण भागात होतेय जनजागृती  

श्रीनाथ वानखडे 
Saturday, 3 October 2020

इंटरनेटच्या महाजालात विविध कंपन्या ग्राहकांना भरमसाठ आमिषे देवून आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे तुम्ही ज्या जाहिराती फेसबूक, युट्यूब व इतर माध्यमांवर शोधत असतात,

मांजरखेड(अमरावती) : महामारीच्या काळात सर्वत्र घरबसल्या ऑनलाइन कामाला प्राधान्य दिले जात असून त्यामुळे हळूहळू लोकं सुद्धा डिजिटली साक्षर होत आहेत. या काळात लोक घराबाहेर निघत नसल्याने चोर सुद्धा ओव्हर स्मार्ट झाले आहेत. घरबसल्या तुमच्या मोबाईलवर लाखोंचे बक्षीस लागल्याचे संदेश सातत्याने आदळत असून लाखोंच्या ऑफर घरबसल्या दिल्या जात आहे. मात्र खेड्यातील नागरिक सुद्धा माध्यममुळे सतर्क झाले असून लाखोंच्या ऑफर पेक्षा आपली चटणी भाकर बरी असल्याचे म्हणत आहेत.

इंटरनेटच्या महाजालात विविध कंपन्या ग्राहकांना भरमसाठ आमिषे देवून आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे तुम्ही ज्या जाहिराती फेसबूक, युट्यूब व इतर माध्यमांवर शोधत असतात, त्याच तुमच्या मानसिकतेचा अभ्यास करून तुमच्या खात्यावर त्याच पद्धतीच्या जाहिराती व लिंक्‍स पाठविल्या जातात. 

सविस्तर वाचा - अचानक का कमी झाली कोरोना बाधितांची संख्या? अतिशय धक्कादायक कारण आले समोर

वाहन व विविध मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांकडे आपले नंबर कोठून येतात याचा कधी विचार केला का? नाही ना. कधी काळी एखादे सीम घेताना, कुठल्या मॉलमध्ये एखादी वस्तू खरेदी केल्यावर दुकानदार तुमचे केवळ नाव व नंबर नमूद करतात. मग सुरू होतात संदेशाचा भडिमार. तुम्ही दिलेले हेच नंबर सर्वत्र वायरल होतात.

काळानुरूप बदलली चोरीची पद्धत

समाज माध्यमाद्वारा एखादी वस्तू खरेदी किंवा विक्री करायची असे सांगून व्यवहाराला सुरुवात होते. खात्यात पैसे टाकण्या संदर्भात थोडे पैसे आता टाकतो, असे सांगून विश्वास संपादन करून नंतर तुमच्या खात्यावर डिजीटली डल्ला मारतात. आपण ग्रामीण भागातील युवक असाल तर पंतप्रधान बेरोजगार भत्ता, मोबाईल रिचार्ज सवलत, शेतकरी कर्जमाफी शिवाय तुमच्या मोबाईल क्रमांकाला 51 लाख, 21 लाख सारखे बक्षीस लागल्याचे संदेश पाठविल्या जातात.

नक्की वाचा - बाल्या बिनेकर हत्याकांड : सहाव्या आरोपीला अटक, सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याची चर्चा

फुकटापेक्षा मेहनत बरी

फुकट मिळत असलेल्या आमिषाला बळी पडण्याचे प्रमाण वाढले असून दर दिवशी शहर व गावं खेड्यात नागरिक बळी पडत आहेत. त्या संदर्भात पोलिसांत गुन्हे सुद्धा दाखल होत आहेत. प्रसार माध्यमांमध्ये दरदिवशी येणाऱ्या बातम्या बघून आता ग्रामीण भागातील नागरिकसुद्धा बऱ्यापैकी सतर्क झाले असून तुमच्या फुकटच्या लाखो रुपयांपेक्षा आमची मेहनतीची चटणी भाकर बरी, असा त्यांचा सूर आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: awareness in rural area against money fraud on social media