बुलडाणा : मानवी रांगोळीतून मतदार जनजागृतीचा संदेश

buldana
buldana

बुलडाणा : युवा मतदारांना लोकशाहीच्या प्रवाहात आणण्यासाठी दरवर्षी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन वेगवेगळे उपक्रम साकारत असते. यामध्ये प्रामुख्याने पथनाट्य, शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली यासह इतर कार्यक्रम हाती घेण्यात येतात. याच धर्तीवर युवा मतदारांमध्ये मतदार जनजागृती प्रभावीपणे व्हावी यादृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्या संकल्पनेतून तब्बल पाच हजार शालेय विद्यार्थी 13 ऑक्टोबरला मानवी रांगोळीच्या माध्यमातून निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह साकारणार आहे. 

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुनर्परिक्षण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांच्या संकल्पनेतून निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची मानवी रांगोळी साकारण्याची संकल्पना प्रत्यक्षरीत्या मैदानावर 13 ऑक्टोबरला जिजामाता क्रीडा संकुलात सकाळी 8 वाजता उतरणार आहे. या अभूतपूर्व उपक्रमात 5 हजार विद्यार्थी सहभागी होणार असून त्याची पूर्वतयारी उत्साहात सुरू आहे. उपक्रमात शहरातील एडेड हायस्कूलचे 855, शारदा ज्ञानपीठचे 755, प्रबोधन हायस्कूलचे 825, भारत विद्यालयाचे 1110, उर्दू  हायस्कूलचे 278, शिवसाई ज्ञानपीठचे 150, सेन्ट जोसेफ हायस्कूलचे 300 असे एकूण 4 हजार 712 विद्यार्थी सहभागी होणार आहे. यामध्ये 3 हजार 322 विद्यार्थी तर एक हजार 390 विद्यार्थिनींचा समावेश आहे. मानवी रांगोळीचा नियमित सराव व रंगीत तालीम करण्यात येत आहे. शनिवारी (ता.6) घेण्यात आलेल्या रंगीत तालीममध्ये 3 हजार 785 विद्यार्थी सहभागी झाले. उद्या (ता. 9) व 11 ऑक्टोबरला सायंकाळी 4 वाजता पुन्हा एकदा अखेरची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. 

मतदार जनजागृतीचा अभिनव उपक्रम
देशात पहिल्याच मतदार जनजागृतीसाठी एकाच दिवशी एकाच मैदानावर पाच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी मानवी रांगोळी साकारणार असून, या उपक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्ने घेतली आहे. हा सोहळा पाहण्यासाठी प्रत्यक्ष कार्यक्रमाला संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचेही कळते. 

जिल्ह्यात आता पर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याच माध्यमातून 13 ऑक्टोबर सकाळी 8 वाजता जिजामाता प्रेक्षागार येथे शहरातील आठ शाळेतील एकूण 5 हजार विद्यार्थी, भारत निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची मानवी रांगोळी उभारून मतदार नोंदणीचे आव्हान करणार आहेत. या सोबतच नागरिकांना मतदार नोंदणी करण्यासाठी आवाहन करणारी  बुलडाण्याची छकुलीची 50 फुटाची रांगोळी सुद्धा काढण्यात येत आहे. शासनाच्या विविध विभागामाफत राबविण्यात येणार्‍या योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात येत आहेत. याकरिता जिल्ह्यातील मतदार नोंदणीच्या सोहळ्यात सर्व बुलडाणा  मतदारांनी व नागरिकांनी सहभागी व्हावे व सर्वांनी मतदार नोंदणी करावी.
- डॉ. निरुपमा डांगे, जिल्हाधिकारी, बुलडाणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com