अकोल्याला परिषदेच्या निमित्ताने बाबासाहेबांचा पदस्पर्श

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

अकोला येथे वऱ्हाड प्रांत कास्ट्स फेडरेशनच्या परिषदेला होती बाबासाहेबांची उपस्थिती होती. जिल्ह्यात प्रथमतः आगमन झाल्यामुळे त्यांचे विचार ऐकण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय जमला होता.

अकोला : अकोला वऱ्हाड प्रांत शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनची (शेकाफे) पहिली परिषद अकोला येथे 9 व 10 डिसेंबर 1945 रोजी भरली होती. या परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित होते. 

परिषदेला अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला व मध्यप्रांतासह दूरदूरच्या ठिकाणाहून शेकडो प्रतिनिधी उपस्थित होते. परिषदेच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जिल्ह्यात प्रथमतः आगमन झाल्यामुळे त्यांचे विचार ऐकण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय जमला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाच्या हक्कांसाठी शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनची स्थापन केलेली संस्था होती. सदर फेडरेशनची पहिली परिषद अकोला येथे 9 व 10 डिसेंबर 1945 रोजी भरली होती. या परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित होते. परिषदेच्या निमित्ताने बाबासाहेबांचे अकोल्यात प्रथमच आगमन होणार असल्याने वऱ्हाड प्रांतातील लाखो नागरिक बाबासाहेबांच्या दर्शनासाठी व त्यांचा संदेश ऐकण्यासाठी आले होते. बाबासाहेबांच्या आगमनानिमित्त अकोला स्टेशनपासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली होती. मिरवणुकीमुळे अकोला स्टेशन रोड ते टिळक मैदान (आताचे टावर चौकातील शास्त्री स्टेडियम) पर्यंतचा रस्ता माणसांनी फुलून गेला होता. परिषदेसाठी संध्याकाळी 5.30 वाजता बाबासाहेबांचे अधिवेशन मंडपात आगमन झाल्यानंतर गगनभेदी घोषणांनी व टाळ्याच्या कडकडाटाने वातावरण दुमदुमले होते. परिषदेची सुरुवात संध्याकाळी 6.45 वाजता नागपुरचे शेंदरे वकीलांच्या गायनाने झाली होती. स्वागताध्यक्ष डी.झेड. पळसपगार यांनी भाषणात जमलेले नागरिक आणि बाबासाहेबांचे स्वागत केल्यानंतर अकोल्याचे ॲड. अकर्ते (कांग्रेस), ॲड. अम्रुतकर (हिंद महासभा), म्यु.कमिटीचे अध्यक्ष रावबहादुर आठवले, मुस्लिम लीगचे सभासद काझी वकील यांनी बाबासाहेबांची मुक्त कंठाने प्रशंसा करुन ते दलीतांचेच नव्हे तर अखिल भारताचे पुढारी असल्याचे जाहीर केले होते.

बाबासाहेबांना दिले होते 1101 रुपये
परिषदेत इंगळे यांनी अखिल वऱ्हाड प्रांतातील नागरिकांतर्फे बाबासाहेबांना देण्यात येत असलेले मानपत्र वाचून दाखविले होते. त्यानंतर बाबासाहेबांना एक हजार 101 रुपयांची थैली अर्पण करण्यात आली होती. पश्‍चात बाबासाहेबांनी मार्गदर्शन करुन उपस्थितांच्या मनात समानतेचे बीज रोवले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: babasaheb visited akola on the occasion of sheduld cast fedration council