तो म्हणतो! कोरोनाबाधिताचे घरच पेटवा! पोलिसांनी केला गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

कोरोनाबाधित असलेल्यांचे घरच पेटवून द्यावे, अशा आशयाचा संदेश समाजमाध्यमावर व्हायरल करणाऱ्या एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धानोरा (जि. गडचिरोली) : कोरोनाने सामान्यांच्या आरोग्यविषयक चिंतेत भर घातलीच आहे. त्याशिवाय समाजाची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घडीही विस्कटली आहे आणि आता जनतेच्या मानसिक आरोग्यावरही याचा परीणाम होत आहे की काय, अशी शंका यावी, असा संदेश सामाजिक माध्यमांवर नुकताच एका युवकाने व्हायरल केला आणि कोरोनाने एकूणच माणसाच्या विचारशक्‍तीवरही राज्य करणे सुरू असल्याचे सिद्ध झाले.
कोरोनाबाधित असलेल्यांचे घरच पेटवून द्यावे, अशा आशयाचा संदेश समाजमाध्यमावर व्हायरल करणाऱ्या एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल म्हशाखेत्री, असे या युवकाचे नाव आहे. या प्रकारामुळे बाधितांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सरकारने यासंदर्भात जनजागृती करावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा या आदिवासीबहुल तालुक्‍यातील या युवकाने व्हॉटसअप गृपवर " कोरोना पॉझिटिव्ह कुटुंबातील व्यक्तीमुळे हा आजार गावात पसरेल व मोठा धोका निर्माण होईल. त्यामुळे त्या व्यक्तीचे घरच पेटवून द्यावे', असा लोकांना नाहक भडकवणारा विकृत संदेश प्रसारित केला होता. गडचिरोली जिल्हा प्रशासनाने या संदर्भातील तक्रारीची तत्काळ गंभीर दखल घेत असा चुकीचा संदेश प्रसारित करणाऱ्या धानोरा येथील अनिल मशाखेत्री याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन व समाजमाध्यमावर चुकीचा संदेश पाठविल्या प्रकरणी शुक्रवारी (ता. 29) सायंकाळी धानोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
धानोऱ्याच्या एका कुटुंबात बाहेरून आलेल्या व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरण कक्षातील लोकांच्या संपर्कात आल्यामुळे संसर्ग झाला. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून त्या कुटुंबाला संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले आहे. शुक्रवारी दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास धानोरा येथील एका व्हॉट्‌सअप ग्रुपवर अनिल मशाखेत्री याने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या कुटुंबातील व्यक्तीमुळे हा आजार गावात पसरेल असे सांगत त्या व्यक्तीचे घरच पेटवून द्यावे, असा संदेश प्रसारित केला. विशेष म्हणजे त्या कुटुंबाचे नावही त्याने या गृपवर पोस्ट करून त्या कुटुंबाची ओळख सर्वांसाठी खुली केली. पीडित क्वारंटाइन व्यक्तीसुद्धा त्या गृपवर असल्याने त्याने या पोस्टचा स्क्रीन शॉट जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पाठवला. दोन्ही अधिकाऱ्यांनी या पोस्टची गंभीर दखल घेत तत्काळ कारवाईचे आदेश दिले. धानोरा पोलिसांनी अनिल मशाखेत्रीवर भादंविचे कलम 188 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा - काय सांगता...! लॉकडाऊननंतर असं बदललं देहव्यापाराचं गणित
 बाधितांमध्ये भीतीचे वातावरण
समाजमाध्यमांवर असे संदेश येत असल्याने बाधितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे आपल्या आयुष्यावर परिणाम होईल की काय?, अशी भीती त्यांना वाटते आहे. ग्रामीण भागात याविषयी जनजागृती नसल्याने असे खोडसाळ प्रकार होत आहेत. प्रशासनाने यासंदर्भात कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A bad statement on social media about corona positives