शेगावला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; चार जण ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

बाळापूर - उमरा कापसे (जि. वाशीम) येथून शेगाव येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर सरकीचा ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात चार भाविकांचा मृत्यू झाला. या अपघातात नऊ भाविक गंभीर जखमी असून, त्यांना अकोला येथील सर्वोपचारमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकचालक व क्लिनर घटनास्थळावरून फरार झाले आहेत. गजानन महाराज प्रगट दिनासाठी दिंडी घेऊन वाशीम जिल्ह्यातील उमरा (कापसे) येथील भाविक शेगाव येथे निघाले होते. वाशीमहून पातूर, वाडेगाव मार्गाने मार्गक्रमण करत असताना वाडेगाव-बाळापूर मार्गावरील बाग फाट्याजवळील एका वळणावर विसाव्यासाठी हे भाविक थांबले. त्यातील काही जण मार्गाच्या कडेला बसले होते. तेथे आलेला ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने वळणावर उलटला. त्यातील सरकीच्या पोत्यांखाली नऊ जण दबले गेले. त्यापैकी चार जण जागीच ठार झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बाळापूर येथील नागरिकांसह बटवाडी, धनेगाव, खामखेड या घटनास्थळापासून जवळच असलेल्या गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत पोचविली व पोलिसांना पाचारण केले. जखमींना तातडीने अकोला येथील रुग्णालयात हलविले आहे.
Web Title: balapur news vidarbha news accident death