बॅलेट पेपरने पुन्हा निवडणूक घ्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

नागपूर - महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी लाभासाठी ईव्हीएममध्ये घोळ केल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय प्रजातंत्र बचाव समितीने जुन्या बॅलेट पेपर पद्धतीने पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. गुरुवारी मोर्चा काढून "ईव्हीएम हटाओ, देश बचाओ' असे नारे देत या समितीतील सर्वच पराभूतांनी लक्ष वेधले. 

नागपूर - महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी लाभासाठी ईव्हीएममध्ये घोळ केल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय प्रजातंत्र बचाव समितीने जुन्या बॅलेट पेपर पद्धतीने पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. गुरुवारी मोर्चा काढून "ईव्हीएम हटाओ, देश बचाओ' असे नारे देत या समितीतील सर्वच पराभूतांनी लक्ष वेधले. 

ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणात घोळ केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर करीत सर्वच पक्षीय पराभूत एकत्र आलेत. याविरोधात लढा उभारण्यासाठी सर्वपक्षीय प्रजातंत्र बचाओ समिती स्थापन करण्यात आली. या समितीतर्फे गुरुवारी सकाळी 11 वाजता चिटणवीस पार्क येथून मोर्चा काढण्यात आला. ईव्हीएम हटाओ, देश बचाओ यासह भाजप सरकारविरुद्ध घोषणाबाजी करीत आंदोलनकर्त्यांनी फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली. मोर्चाला पोलिसांनी संविधान चौकात अडविले. त्यामुळे मोर्चातील सर्वांनी प्रचंड नारेबाजी करीत निषेध नोंदविला. नेतृत्व कॉंग्रेसचे नेते विशाल मुत्तेमवार, शेख हुसेन, शिवसेनेचे माजी नगरसेवक बंडू तळवेकर, किशोर पराते, रविनिश पांडे, बसपचे अतुल सेनाड, कॉंग्रेसच्या कांता पराते, सुरेश जग्यासी, मिलिंद सोनटक्के, राष्ट्रवादीचे ईश्‍वर बाळबुधे, माजी महापौर किशोर डोरले यांनी केले. सुशील बालपांडे, असलम खान, रमन ठवकर, शफीक दिवान, अजीम तौसिफ, रवी गाडगे, गुड्डू रहांगडाले, खुशाल हेडाऊ, वंदना इंगोले, मीना तिडके, किरण पाटणकर, अमित बागवे, सय्यल फैजुला, ऍड. शैलेश जयस्वाल, चंद्रशेखर चौरसिया, मोतीराम मोहाडीकर, अनिल दुरुगकर यांच्यासह तब्बल 50 पराभूत उमेदवार व हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. महापालिका निवडणूक रद्द करून फेरमतदान घ्यावे, सीबीआयमार्फत चौकशी करावी, प्रभाग पद्धती रद्द करण्यात यावी, आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्यात. प्रभाग पद्धतीमुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले. अनेक मतदारांपर्यंत मतदान बूथ क्रमांक आणि बूथचे नाव असणाऱ्या पावत्या पोहोचल्या नाहीत. ईव्हीएमसंदर्भात कोणत्याही प्रकारचे नोटीफिकेशन प्रकाशित करण्यात आले नाही, आदी निवडणूक प्रक्रियेतील अनेक दोषांकडे आंदोलनकर्त्यांनी निवेदनातून लक्ष वेधले आहे. 

न्यायालयीन लढ्याचा निर्धार 
महापालिकेच्या निवडणुकीतील मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेमध्ये अनियमितता आणि घोळ झाला याचा फटका आम्हाला बसला आहे, असा पराभूत उमदेवारांचा आरोप आहे. या विरोधात न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार केला आहे. पहिल्या टप्प्यात आंदोलन व मोर्चा काढून मागणी रेटून धरण्यात आली. आता फेरमतदानासाठी न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली जाणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. 

Web Title: Ballot papers for re-election