शासकीय रुग्णालयाची धुरा कंत्राटी बीएएमएस डॉक्‍टरांवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

हिंगणघाट (जि. वर्धा) : सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट अ एमबीबीएसच्या रिक्त पदांवर कंत्राटी पद्धतीने बीएएमएस डॉक्‍टर नियुक्तीचा शासननिर्णय 4 जुलैला घेण्यात आला आहे. शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीमार्फत भरण्यात येणार आहे. या निर्णयाने ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

शासकीय रुग्णालयात आरोग्यसेवा देण्यात एमबीबीएस डॉक्‍टर नाखूष असल्याने ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयत्न करूनही एमबीबीएस पदवी व पदव्युत्तर डॉक्‍टर मिळत नाहीत. मंजूर वैद्यकीय पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा कोलमडली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार आता ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा परिषदअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी गट "अ" एमबीबीएस अर्हताधारक पदे रिक्त आहेत. अशी पदे बीएएमएस डॉक्‍टर उमेदवारांमधून भरण्यात यावी, असे निर्देश राज्यातील सर्व संबंधितांना शासनाने परिपत्रकाद्वारे दिले आहे. या रिक्‍त पदांवर बीएएमएस डॉक्‍टरांची नियुक्ती 11 महिन्यांकरिता राहणार आहे. यादरम्यान त्या नियुक्त जागेवर नियमित वैद्यकीय अधिकारी किंवा बंधपत्रित एमबीबीएस अर्हताधारक उमेदवार उपलब्ध होईपर्यंत ही नियुक्ती राहणार आहे.
कंत्राटी वैद्यकीय बीएएमएस डॉक्‍टरांना आदिवासी व दुर्गम भागात काम करण्यासाठी दरमहा 45 हजार तर इतर भागात काम करण्यासाठी 40 हजार रुपये एकत्रित मानधन म्हणून देण्यात येणार आहे. उपरोक्त कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासननिर्णय 2 मार्च व 21 एप्रिल 2015 मधील अटी व शर्ती लागू राहणार आहे. या शासननिर्णयाने ग्रामीण भागात तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या व सामान्य रुग्णांना स्थानिक पातळीवर वैद्यकीय उपचार मिळणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BAMS doctors on contracts has responsiblity of government hospital