अखेर घाटंजीतून दारू झाली हद्दपार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

घाटंजी (जि. यवतमाळ) - दारूबंदीसाठी पुकारलेल्या स्वामिनींच्या लढ्याला अखेर यश आले. घाटंजी शहरातील नगरपालिकेच्या हद्दीतील गेलेल्या राज्य मार्गावरील 500 मीटर आतील दारूची सर्व दुकाने शुक्रवारी (ता. 21) सील करण्यात आली. एकाच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने 16 दारूदुकाने सील करून घाटंजीतून दारूच हद्दपार करण्यात आली. 

घाटंजी (जि. यवतमाळ) - दारूबंदीसाठी पुकारलेल्या स्वामिनींच्या लढ्याला अखेर यश आले. घाटंजी शहरातील नगरपालिकेच्या हद्दीतील गेलेल्या राज्य मार्गावरील 500 मीटर आतील दारूची सर्व दुकाने शुक्रवारी (ता. 21) सील करण्यात आली. एकाच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने 16 दारूदुकाने सील करून घाटंजीतून दारूच हद्दपार करण्यात आली. 

घाटंजी तालुक्‍यातून स्वामिनी दारूबंदीचा लढा सुरू झाला. आज तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. तालुक्‍यातील दारूदुकाने वाचविण्यासाठी काही भ्रष्ट अधिकारी आणि दारू दुकानदारांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी स्वामिनी संघटना, नगरपालिका सभापती, राजकीय पक्ष आणि काही सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पुनर्मोजणीची मागणी केली. त्यात 500 मीटर अंतरात असलेली सर्व दारूदुकाने सील करण्यात आली. राज्य व राष्ट्रीय महामार्गालगतची 500 मीटर अंतरावरील दारू दुकाने बंद करा, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. परंतु, येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य महामार्ग क्रमांक 273 आणि 267 बाबत चुकीची माहिती देऊन शासनाची दिशाभूल केली. नगर परिषद घाटंजी हद्दीतून जाणारा राज्य महामार्ग हा नगर परिषद घाटंजीचा आहे, असे सांगून दारूदुकाने वाचविली होती. परंतु, या रस्ता हस्तांतरणाच्या अधिसूचना नाहीत, त्यासाठी राज्यपालांच्या स्वाक्षरीचा जीआर पाहिजे, हाच आधार घेत स्वमिनीचे मुख्य संघटक महेश पवार, नगर परिषद सभापती अर्चना संजय जाधव, आरोग्य सभापती विजय रामटेके, सामाजिक कार्यकर्ता अमित प्रधान, प्रशांत उगले, महेंद्र देवतळे आणि गुरुदेव वॉर्डातील शेकडो महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे रस्ता पुनर्मोजणीची मागणी केली होती. त्याअनुषंगाने 13 एप्रिलला सार्वजनिक बांधकाम विभाग घाटंजी, भूमी अभिलेख, राज्य उत्पादन शुल्क विभाग पांढरकवडा यांनी पुनर्मोजणी केली. या मोजणीत घाटंजी शहरातील सर्व दारूदुकाने 500 मीटरच्या आत असल्याचे सिद्ध झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी चार बिअरशॉपी, नऊ वाइनबार, तीन देशी दारू दुकानांना सील करण्याचे आदेश दिले. 

यवतमाळातील दारू दुकाने हटविणार 
घाटंजी येथील सर्व दारूदुकाने बंद करण्याच्या लढाईत यश मिळाले. आता, यवतमाळ शहरातील नगरपालिका हद्दीतील 64 दारू दुकानांना रस्ते हस्तांतरणाच्या नावावर वाचविण्यात आले. ती दुकाने बंद झाल्याशिवाय स्वामिनी संघटना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा स्वामिनीचे संयोजक महेश पवार यांनी दिला आहे. 

Web Title: ban on wine