बॅंक ऑफ इंडियाला पुन्हा पंधरा दिवसांची मुभा - डॉ. काणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नावाने असलेला २० लाखांचा बनावट धनादेश बॅंक ऑफ इंडियाच्या दुर्लक्षित धोरणामुळे वटविण्यात आला. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत बॅंक ऑफ इंडियाने ही रक्कम विद्यापीठाला देण्याचे कबूल केले. आता व्यवहार बंद करण्याचे पत्र दिल्यानंतर बॅंकेने पुन्हा पंधरा दिवसांची मुभा मागितली. त्यावर व्यवस्थापन परिषदेने बॅंकेला मुभा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कुलगुरू डॉ. काणे यांनी दिली.

महावीर कन्स्ट्रक्‍शन कंपनीद्वारे भरण्यात आलेल्या २० लाखांचा अनामत रक्कमेचा धनादेश विद्यापीठाच्या वित्त विभागाकडे असताना, तो यवतमाळ येथील कॅनरा बॅंकेतून वठविण्यात आल्याची बाब निदर्शनास आली होती. वित्त विभागाने तपासणी केली असता, हा धनादेश वित्त विभागाकडेच असल्याचे समजले. त्यावरून वटलेला धनादेश बनावट असल्याचे बॅंक ऑफ इंडियाच्या निदर्शनास आणून दिले. तपासामध्ये तीन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बऱ्याच प्रमाणात पोलिसांना माहिती मिळाली. मात्र, या प्रकरणात विद्यापीठाने बॅंक ऑफ इंडियावर दोषारोप करून पैसे परत करण्याची मागणी केली. तशी नोटीसही विद्यापीठाने बजावली होती. त्यावर बॅंक ऑफ इंडियानेही चूक कबूल करीत, २० लाख परत देण्याचे मान्य केले. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेकडेही तक्रार करण्यात आली आहे. तर, बॅंक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कुलगुरूंसमक्ष बैठक घेण्यात आली असून या प्रकरणी चर्चा झाली. मात्र, चर्चेतून काहीही पुढे आले नाही. मात्र, बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे परत देऊ असा शब्द दिला आहे. त्यामुळे विद्यापीठाने बॅंकेला पाच फेब्रुवारीपर्यंत चर्चा करावी अन्यथा सर्व व्यवहार बंद  करू अशी ताकीद दिली होती. त्यानंतरही बॅंकेने धोरण ठरविले नसल्याने विद्यापीठाकडून सर्व व्यवहार बंद करण्याचे पत्र पाठविले. मात्र, त्यावर बॅंकेने पंधरा दिवसांची मुभा देण्याची विनंती केली. त्यावर व्यवस्थापनाच्या बैठकीत चर्चा करून बॅंकेला पंधरा दिवसांत पैसे परत करण्याचा वेळ देण्यात आला.

Web Title: bank of india 15 days time period