अमरावतीत खासगी लॅबमध्ये कोविड चाचणीला बंदी; हॉटेल्स, रेस्टॉरेंटच्या वेळा कमी करणार

सुधीर भारती 
Wednesday, 17 February 2021

बार, रेस्टॉरंट, उपाहारगृहांमध्ये 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ग्राहकांची उपस्थिती राहणार नाही तसेच सोशल डिस्टन्सिंगची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित व्यवस्थापक व मालकांवर सोपविण्यात आली

अमरावती: कोरोना रुग्णांचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग व्यवस्थित होत नसल्याने खासगी प्रयोगशाळांना आता रॅपिड ऍन्टीजेन चाचणीवर बंदी घालण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कोरोनाशी संबंधित संपूर्ण चाचण्या शासकीय रुग्णालयांमध्येच कराव्या लागणार आहेत. खासगी लॅबबाबत तक्रारी येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट तसेच बिअरबारची वेळ 11 वरून 10 पर्यंत कमी करण्यात आली आहे. रात्री दहापर्यंत संपूर्ण बाजारपेठ बंद असणार आहे.

बार, रेस्टॉरंट, उपाहारगृहांमध्ये 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ग्राहकांची उपस्थिती राहणार नाही तसेच सोशल डिस्टन्सिंगची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित व्यवस्थापक व मालकांवर सोपविण्यात आली असून नियमांचा भंग केल्यास संबंधित प्रतिष्ठानाला 10 दिवस सील लावण्याची कारवाई केली जाणार आहे. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येचा ग्राफ सातत्याने वाढत आहे. 

 हेही वाचा - शेतातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या महिला; डोकावून पाहताच सरकली पायाखालची जमीन

अनेक नागरिक शासकीयऐवजी खासगी लॅबमध्ये चाचण्या करीत आहेत. मात्र त्या तुलनेने रुग्णांच्या संपर्कातील लोकांपर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच कोविड चाचणी आता केवळ शासकीय प्रयोगशाळांमध्येच होणार आहे. मात्र या निर्णयात काही प्रमाणात सूटसुद्धा राहणार आहे. एखाद्या रुग्णाची शस्त्रक्रिया करावयाची असेल तर त्या हॉस्पिटलकडून खासगी लॅबमध्ये रक्तनमुने पाठविण्याची सोय राहणार आहे, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

मॉल्स, कार्यालयांना अधिक दंड

शहरातील मॉल्स तसेच मंगल कार्यालयांना आतापर्यंत नाममात्र दंड ठोठावण्यात येत होता, मात्र आता दंड अधिक कठोर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे मॉल्स तसेच मंगल कार्यालयांनी नियमांचा भंग केल्यास किमान 20 हजारांचा दंड ठोठावण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

"त्या' नमुन्यांबाबत आयसीएमआर सांगणार

अमरावतीमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन असल्याची शक्‍यता गृहित धरून शासनाकडून पाच ते सात रक्तनमुने पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेला पाठविण्यात आले होते. त्या रक्तनमुन्यांचे परीक्षण झाल्याची शक्‍यता असून याबाबतच्या निष्कर्षाला आयसीएमआर तसेच एनआयव्ही पुणे यांच्याकडूनच दुजोरा मिळणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - यवतमाळमध्ये पूजा अरुण राठोडचा गर्भपात; डॉक्टर आठ दिवसांपासून गायब ?

दररोज विविध प्रयोगशाळांमध्ये दोन हजार ते दोन हजार दोनशे चाचण्या करण्यात येत असून चाचण्यांचा वेग आणखी वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
-शैलेश नवाल, 
जिल्हाधिकारी.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banned on testing of covid in private labs in Amravati