खड्ड्यांसंदर्भातील तक्रारीसाठी सोशल मीडियाचा आधार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

 
नागपूर : शहरात अद्यापही खड्डे कायम असल्याची प्रांजळ कबुली महापालिकेने दिली असून, आता खड्ड्यांसंदर्भातील तक्रारीसाठी सोशल मीडियाचा आधार घेण्यात येणार आहे. खड्ड्यांबाबत अचूक आणि योग्य माहिती मिळाल्यास तत्काळ ते बुजवता येऊ शकतात, यासाठी मनपाच्या ई-मेल, फेसबुक व ट्विटर पेजवर तक्रार नोंदवून सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त अभिजित बांगर यांनी केले. 

 
नागपूर : शहरात अद्यापही खड्डे कायम असल्याची प्रांजळ कबुली महापालिकेने दिली असून, आता खड्ड्यांसंदर्भातील तक्रारीसाठी सोशल मीडियाचा आधार घेण्यात येणार आहे. खड्ड्यांबाबत अचूक आणि योग्य माहिती मिळाल्यास तत्काळ ते बुजवता येऊ शकतात, यासाठी मनपाच्या ई-मेल, फेसबुक व ट्विटर पेजवर तक्रार नोंदवून सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त अभिजित बांगर यांनी केले. 
नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारी आणि सर्वेक्षणाद्वारे निदर्शनास आलेले खड्डे बुजविण्यात आले. मात्र, शहरातील अनेक भागांत अजूनही खड्डे कायम असून, अपघातास कारणीभूत ठरत आहे. या खड्ड्यांची माहिती मिळाल्यास मनपातर्फे त्वरित बुजविण्याचे काम करण्यात येईल. यासाठी आता ई-मेलसह फेसबुक आणि ट्‌विटर पेजवर तक्रार करता येईल. नागरिकांना आता कुठेही खड्डा दिसून आल्यास मनपाच्या potholecomplaints@gmail.com या ई-मेल पत्त्यावर तर तसेच https://m.facebook.com/nmcngp/ या फेसबुक पेजवर आणि https://twitter.com/ngpnmc या ट्विटर पेजवर तक्रार करता येईल. शहरातील खड्ड्यांसंदर्भात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची समन्वय समितीही गठित केली आहे. समितीतर्फे शहरात खड्डे दुरुस्त करण्यात येत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. रस्ता वापरण्यायोग्य नसल्यास व रस्त्यावर अपघात झाल्यास उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. कंत्राटदारावर गुन्हा न नोंदविल्यास संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्‍चित करून गुन्हा नोंदविला जाणार आहे. त्यामुळे खड्ड्यांसंदर्भात गांभीर्याने आणि जबाबदारीने काम करण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.  
अशी करता येईल तक्रार 
ई-मेल, फेसबुक आणि ट्विटर पेजवर तक्रार करताना तक्रारकर्त्यांनी संबंधित रस्त्याचे अचूक स्थान जिओ टॅगिंगद्वारे नमूद करावे. याशिवाय तिन्ही सोशल मीडियावर करण्यात येणाऱ्या तक्रारी या केवळ खड्ड्यांसंदर्भातच असाव्यात. संपूर्ण रस्ता उखडला असल्यास त्याबाबत रीतसर लेखी तक्रार मनपा कार्यालयात करावी. विशेष म्हणजे नागपूर सुधार प्रन्यास, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अखत्यारीतील मार्गांवरील खड्ड्यांच्या तक्रारी त्यांच्या ई-मेल, फेसबुक आणि ट्‌विटर पेजवर पाठवाव्यात. नागपूर सुधार प्रन्यास, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अखत्यारीतील तक्रारी मनपाच्या ई-मेल, फेसबुक आणि ट्‌विटर पेजवर आल्यास त्या संबंधित विभागाकडे फॉरवर्ड करण्यात येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The basis of social media for complaints regarding potholes