सावधान एटीएमवर डोळा सायबर टोळ्यांचा

सावधान एटीएमवर डोळा सायबर टोळ्यांचा

नागपूर - ‘एटीएम’मधून पैसे काढून देणे किंवा पैसे काढण्यास मदतीचे आश्‍वासन देऊन पैशावर डल्ला मारणाऱ्या टोळ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकविरहीत एटीएममधून पैसे काढणे टाळणे किंवा रक्षकविरहीत एटीएमवरून पैसे काढताना गुप्ततेची खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा, सायबरटोळीचे शिकार व्हावे लागेल, अशी स्थिती आहे.  

ऑनलाईन व्यवहारास सरकारचे प्रोत्साहन आहे. मात्र, ऑनलाईन फसवणुकीची हजारो प्रकरणे समोर आली आहेत. ऑनलाईन फसवणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. नागपुरात जवळपास ३५ टक्‍के एटीएमना सुरक्षा रक्षक नाहीत. अशा एटीएममधून रात्री-अपरात्री पैसे काढणे धोक्‍याचे बनतंय. पैसे काढण्यास मदत किंवा एटीएम कार्ड घेऊन पैसे काढून देण्याचा बहाणा करणे, अशी युक्‍ती टोळी अवलंबते. त्यानंतर एटीएम बदलून गंडा घातला जातो. यासोबतच लिंक पाठवून किंवा एसएमएस पाठवून लुटणाऱ्या टोळ्यांचीही संख्या वाढली आहे. ऑनलाईन शॉपिंग किंवा वस्तू मागवताना योग्य काळजी घ्यावी, अन्यथा क्षणार्धात बॅंक खात्यातून मोठी रक्‍कम काढली  जाण्याची भीती आहे.

हॅकरने लुटले चार लाख
नागपुरातील नंदनवन परिसरातील एका बॅंकेच्या सुरक्षारक्षकविरहीत एटीएम उत्तर प्रदेशच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने चार साथीदारांच्या मदतीने हॅक केले. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी एटीएम मशिनमधून तब्बल ४ लाख काढले. त्यानंतर लगेच उत्तर प्रदेश गाठले. मात्र, झोन-चारच्या सायबर क्राईम टीमने पाचही आरोपींना अटक केली. यशोधरानगर चौकात राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या एटीएमच्या दारासमोरच रात्री नऊनंतर युवकाचे टोळके टवाळकी करते. त्यामुळे महिला व युवती त्याचा वापर टाळतात. हे टोळके महिलांवर शेरेबाजीदेखील करते. अंबाझरीतील रामनगर परिसरातील एटीएम परिसरात रात्री आठनंतर दारूड्यांचा तळ असतो.

डेबिट कार्ड सांभाळा... 
सायबर गुन्ह्यात सर्वाधिक गुन्हे हे क्रेडिट आणि डेबिट कार्डप्रकरणी आहेत. गतवर्षात त्याचे दोन हजार ३०० वर गुन्हे घडले, दुसऱ्या क्रमांकावर ऑनलाइन बॅंकिंग घोटाळे आहेत. यामध्ये मागील चार वर्षांत एक हजार ९०० पेक्षा अधिक गुन्हे घडलेत. मोठमोठ्या बॅंकांवर सायबर हल्ला करून लाखो रुपये लुटले होते. ही सायबर लूट बॅंक हॅकर जगातील कुठल्याही देशात राहून करतात. त्यामुळे डेबिट कार्ड वापरताना पुरेशी काळजी आवश्‍यक आहे.

सायबरगुन्ह्यांचे बदलते स्वरूप
सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढताहेत, त्यांचे स्वरूपही बदलतंय. डाटा हॅक करणे, सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणे, आर्थिक फसवणूक, एटीएम व क्रेडिट कार्डचे नंबर विचारणे, नोकरीच्या आमिषाने फसवणे, भेट वस्तूंचे आमिष अशांना लोक बळी पडतात. तथापि, ऑनलाईन फसवणुकीचा छडा लावण्यात पोलिसांना बऱ्यापैकी यश येत आहे.

ज्या एटीएमवर सुरक्षारक्षक नसतात, अशांबाबत गस्तीवरील पोलिसांना विशेष सूचना दिल्या जातात. दर तासाला त्या एटीएमकडे गस्त घालण्यात येते. तेथील नोंदी टिपण्यात येतात. प्रत्येक एटीएमवर सुरक्षारक्षक अनिवार्य आहे. परंतु काही एटीएमवर सुरक्षारक्षक नसतात. पोलिस कर्मचारी प्रामुख्याने अशा एटीएमची यादी तयार करतात. त्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देतात.
- नीलेश भरणे, पोलिस उपायुक्‍त, झोन-४, नागपूर

(पूवार्ध)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com