esakal | अस्वलाच्या हल्ल्यात वृद्धेचा फुटला डोळा अन् गंभीर जखमा
sakal

बोलून बातमी शोधा

अस्वलाच्या हल्ल्यात वृद्धेचा फुटला डोळा अन् गंभीर जखमा

अस्वलाच्या हल्ल्यात वृद्धेचा फुटला डोळा अन् गंभीर जखमा

sakal_logo
By
दशरथ जाधव

आर्वी (जि. वर्धा) : शेतात बैल चारत असताना अस्वलाने अचानक हल्ला करून ७१ वर्षीय शेतकरी महिलेला गंभीर जखमी केले. जखमीला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास बेल्हारा शिवारात ही घटना घडली. परिसरातील ही तिसरी घटना असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंडीबाई श्रावण राठोड (७१) असे जखमी महिलेचे नाव आहे. ती बेल्हारा (तांडा) येथील रहिवासी आहे.

प्राप्त माहितीनुसार, मंडीबाई यांचे बेल्हारा मौज्यात माड शिवारामध्ये कोरडवाहू चार एकर शेत आहे. पती श्रावण राठोड हे ८१ वर्षांचे आहे. त्यांच्याकडून शेतीचे काम होत नसल्याने बैल चारण्यापासून तर सर्व कामे मंडीबाईच करतात. शुक्रवारी सकाळी घरची कामे आटोपून त्या बैलांना घेऊन शेतात गेल्या. शेताच्या धुऱ्यावर बैलांना चारत असताना दुपारी तीन वाजताच्या सुमारास अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा एक डोळा फुटला तर चेहऱ्यावर खोलवर जखमा झाल्या आहेत.

हेही वाचा: भाजपवर आरएसएसचा नव्हे तर अदाणी-अंबाणीचा अंकुश

त्यांनी आरडाओरड केल्याने शेजारील शेतकरी धावून आले. त्यांनी जोरजोरात आरडाओरड केल्यामुळे अस्वलाने पळ काढला आणि मंडीबाई यांचे प्राण वाचले. जखमी मंडीबाई यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, एक डोळा फुटल्याने व चेहऱ्यावर खोल जखम झाल्यामुळे प्राथमिक उपचार करून त्यांना कस्तुरबा गांधी रुग्णालय सेवाग्राम येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.

परिसरातील तिसरी घटना

चिंचोली, पाचोड (ठाकूर), हर्रासी, हिवरा, बेल्हारा या गावालगतच घनदाट असे संरक्षित वनक्षेत्र आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वलाचे वास्तव आहे. गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वनक्षेत्रा लगत आहे. यापूर्वी पाचोड (ठाकूर) येथील कवडू राठोड व भास्कर जाधव या शेतकऱ्यांवर सुध्दा अस्वलाने हल्ला करून जखमी केले होते. परिसरातील लागोपाठ घडलेली ही तिसरी घटना आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

हेही वाचा: देवानंदचा १३५ दिवस मृत्यूशी संघर्ष; धोका टळलेला नाही

वनक्षेत्र अधिकारी जाधव यांनी तातडीने दिली मदत

घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्र अधिकारी एन. एस. जाधव यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालय गाठले. डॉक्टरांकडून जखमी मंडीबाई हिच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि तिला पुढील उपचारासाठी सेवग्राम येथे रवाना केले. शिवाय दहा हजारांची तातडीची मदत सुध्दा दिली.

loading image
go to top