अमरावतीत प्रेमप्रकरणातून युवकाच्या खुनाचा प्रयत्न 

संतोष ताकपिरे 
Friday, 6 November 2020

काही दिवसांपासून यश व योगेश घोडेस्वार या दोघांमध्ये धुसफूस सुरू होती. योगेश व त्याचा साथीदार यशला भेटण्यासाठी आधी एलआयसी ऑफीसजवळ गेला. तेथे त्यांच्यात शाब्दिक वाद झाला.

अमरावती ः शहरातील यशोदानगर ते मोतीनगर मार्गावर एका उपहारगृहासमोर युवकावर प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. गुरुवारी (ता. पाच) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. 

यश नरेंद्र बल्लाळ (वय २५, रा. भाजीबाजार) असे हल्ल्यातील गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. योगेश घोडेस्वार याच्यासह त्याच्या अन्य एका सहकाऱ्याने हा हल्ला केल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली. एका प्रेमप्रकरणाच्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी सांगितले. मोतीनगर मार्गावरील प्रज्वल उपहारगृहासमोर ही घटना घडली. 

`माझी कन्या भाग्यश्री` पोहोचली ७८४ घरांत; मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनाचा उपक्रम 
 

काही दिवसांपासून यश व योगेश घोडेस्वार या दोघांमध्ये धुसफूस सुरू होती. योगेश व त्याचा साथीदार यशला भेटण्यासाठी आधी एलआयसी ऑफीसजवळ गेला. तेथे त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. काहींनी हटकल्यामुळे यशसह योगेश व त्याचा साथीदार हे त्यानंतर छत्रीतलाव परिसरात गेले. येथे पुन्हा त्यांच्यात चर्चा आणि वाद सुरू झाला. त्यानंतर यशला घेऊन ते दोघे मोतीनगर मार्गावरील उपहारगृहाजवळ आले. वादानंतर समेट न घडल्यामुळे पुन्हा शाब्दिक चकमक उडाली. योगेश व त्याच्या साथीदाराने यश बल्लाळ याला जबर मारहाण केली. चाकूने यशवर पाच ते सहा वार करून हल्लेखोरांनी पळ काढला. 

धक्कादायक! सायंकाळी मुलीने लावला तुळशीजवळ दिवा; वात चोरून उंदराने लावली घराला आग
 

पोलिसांनी गंभीर जखमी यशला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी यशला खासगी रुग्णालयात हलविले. जखमीच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी घोडेस्वारसह साथीदाराविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Because of love, attempt to attack youth in Amravati