"माझी कन्या भाग्यश्री' पोहोचली 784 घरांत; मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनाचा उपक्रम

सूरज पाटील
Friday, 6 November 2020

गेल्या 2017-2018 या वर्षात 389 लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात 88 लाख रुपये जमा करण्यात आले. 2018-2019मध्ये 53 लाभार्थींच्या खात्यात 15 लाख 75 हजार, तर 2019-2020 या वर्षांत 231 लाभार्थ्यांच्या खात्यात 56 लाख 50 लाख याप्रमाणे रक्कम जमा करण्यात आली.

यवतमाळ : मुलगी प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहे. तरीदेखील कुटुंबात वंशाचा दिवाच हवाच, असा अट्टाहास आजही सुक्षिक्षित व्यक्तीकडून केला जातो. त्यामुळे पुरुष, स्त्री जन्मदरात तफावत आढळून येते. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महिला व बालविकास विभागाने सुरू केलेली "माझी कन्या भाग्यश्री' योजना जिल्ह्यात 784 घरांत पोहोचली आहे. एकूण लाभाची रक्कम एक कोटी 60 लाख 25 हजार रुपये इतकी आहे.

गेल्या 2017-2018 या वर्षात 389 लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात 88 लाख रुपये जमा करण्यात आले. 2018-2019मध्ये 53 लाभार्थींच्या खात्यात 15 लाख 75 हजार, तर 2019-2020 या वर्षांत 231 लाभार्थ्यांच्या खात्यात 56 लाख 50 लाख याप्रमाणे रक्कम जमा करण्यात आली. 2020-2021 या वर्षांत महिला व बालकल्याण विभागाकडे 111 प्रस्ताव आलेले आहेत. 42 लाभार्थ्यांचे प्रस्ताव बॅंकेकडे सादर करण्यात आले. 

सविस्तर वाचा - प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय नक्की करून बघा

69 प्रस्ताव कार्यवाहित आहेत. मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविण्यासाठी "माझी कन्या भाग्यश्री' ही योजना एक ऑगस्ट 2017 पासून सुधारीत स्वरूपात सुटसुटीत केली. पहिली व दुसऱ्या मुलीनंतर शस्त्रक्रीया केल्यास योजनेचा लाभ मिळतो. मुलीचा विवाह 18 वर्षापर्यंत होता कामा नये, ही अट ठेवण्यात आली. त्यामुळे बालविवाहालादेखील प्रतिबंध घालण्यात आला. 

सात लाख 50 हजार रुपये वार्षिक उत्पन्न असलेले घटकही योजनेसाठी पात्र आहेत. विधवा महिलेने पती निधनाचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर केल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्राची मागणी करण्यात येत नाही. ज्या कुटुंबात एक ऑगस्ट 2017पूर्वी एक मुलगी आहे व एक ऑगस्टनंतर दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यास, माता पित्याने कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर दुसऱ्या मुलीला 25 हजार रुपये इतका योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे. 

सावित्रीबाई फुले कन्या पारितोषिक योजना एक ऑगस्ट 2017पासून सार्वजनिक आरोग्य विभागाने बंद केली. त्यामुळे या योजनेचा लाभ घेतला नाही, या प्रमाणपत्राची मागणी करण्याची सक्ती नाही.

अधिक माहितीसाठी - साहेबऽऽ आता आत्महत्या करण्याची रितसर परवानगी घेणार; पिककर्जाची अत्यंत गरज

मुलगी मुलापेक्षा कुठेही कमी नाही. तरीदेखील मुलीचा जन्मदर कमी आहे. मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबविली जाते.
- विशाल जाधव, 
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जि. प. यवतमाळ. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mazi kanya Bhagyashr scheme reached 784 houses i