खरीपातील पिकांना संजीवनी; दोन आठवड्यांनंतर सार्वत्रिक पाऊस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

अकोला जिल्हा आणि वऱ्हाडात ३० जुलैनंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे खरिपातील पिके संकटात सापडली होती. काही ठिकाणी कापूस आणि सोयाबीनची पिके सुकू लागली होती. मात्र, गुरुवारी पहाटे दोन वाजतापासून रिपरिप पावसाला सुरवात झाली.

अकोला - दोन आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाला गुरुवारी पहाटेपासून सुरुवात झाली. पहाटे दोन वाजतापासून रिपरिप सुरू असलेल्या या पावसाने खरिपातील पिकांना संजीवनी मिळाली आहे. 

अकोला जिल्हा आणि वऱ्हाडात ३० जुलैनंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे खरिपातील पिके संकटात सापडली होती. काही ठिकाणी कापूस आणि सोयाबीनची पिके सुकू लागली होती. मात्र, गुरुवारी पहाटे दोन वाजतापासून रिपरिप पावसाला सुरवात झाली. मध्ये-मध्ये पावसाचा जोर वाढत आहे. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर आलेल्या या पावसाने पिके तर तारल्या गेलीच, त्यासोबतच जलसाठ्यांमध्येही वाढ होण्यास मदत होणार आहे.

सकाळपर्यंत १० मि.मि. पाऊस -
अकोला जिल्ह्यात सकाळी ८.३० वाजेपर्यंत १० मि.मि. पाऊस झाला. सर्वाधिक १६.६ मि.मी.पाऊस बार्शीटाकळी तालुक्यात नोंदविल्या गेला. त्यापाठोपाठ बाळापूर १५.१ आणि पातूर तालुक्यात १३.६ मि.मी.पावसाची नोंद झाली. अकोला आणि मूर्तिजापूर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी अकोट आणि तेल्हारा तालुक्यात मात्र पावसाचा जोर कमीच आहे.

बार्शीटाकळीचे शंभरीकडे वाटचाल -
या मॉन्सूनमध्ये बार्शीटाकळी तालुका वार्षिक  सरासरीच्या तुलनेत १०० टक्के पावसाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. या तालुक्यात आतापर्यंत ६४३.१ मि.मि. पाऊस झाला. सर्वात कमी पावसाची नोंद तेल्हारा तालुक्यात झाली आहे. येथे आतापर्यंत ३६ टक्केच पाऊस पडला आहे. अकोट तालुक्यातही ५१ टक्केच पाऊस झाला. अकोला तालुक्यात ७६, बाळापूर ६०, पातूर ६४ आणि मूर्तिजापूर तालुक्यात ९१ टक्के पाऊस झाला आहे.

Web Title: Benefit to crops because of Rain is everywhere in the state