सावधान...फेसबुकवरूनही होतेय फसवणूक ; बनावट आयडी तयार करून मागतात पैसे 

file photo
file photo

गडचिरोली : कधी बॅंकेतून बोलतोय असे सांगून एटीएमचा कोड किंवा पीन मागणारे, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्राम आणि विविध ऍप्सच्या माध्यमातून फसवणूक करणारे सायबर चोर आता फेसबुकचाही वापर करायला लागले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात चक्‍क खासदारांच्या नावाची बनावट आयडी तयार करून अशी फसवणूक करण्यात आली. त्यामुळे फेसबुक वापरणाऱ्यांनी आता सावधान होण्याची गरज निर्माण झाली आहे. 

सोमवारी (ता. ३) येथील खासदार अशोक नेते यांच्या नावाची बनावट फेसबुक आयडी तयार करून काहीजणांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाला. काही नागरिकांनी थेट खासदार नेते यांच्या कार्यालयाशी संपर्क साधल्याने हे प्रकरण लवकर उघडकीस आले आणि त्यांनी तत्काळ गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार केली. काही दिवसांपूर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी सोनडवले यांचीही अशीच फेसबुक आयडी तयार करून त्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना पैशांची मागणी करण्यात आली होती. त्यातील काही कर्मचाऱ्यांनी संदेशात नमूद खाते क्रमांकावर पैसेसुद्धा पाठवले. त्यांनीही पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. सोमवारीच ठोक औषध विक्रेते राजेश उर्फ बोधराज इटनकर यांना क्‍यूआर कोडची माहिती मागून त्यांच्या बॅंक खात्यातून तब्बल ३८ हजार ९४४ रुपयांची रक्‍कम लंपास करण्यात आली. या सतत घडणाऱ्या घटनांमुळे सायबर चोरांची नजर गडचिरोली जिल्ह्यावर पडल्याचे दिसून येत आहे. शिवाय फसवणुकीसाठी फेसबुकचा वापर हासुद्धा नवीन पॅटर्न आहे. त्यामुळे आता फेसबुक वापरणाऱ्यांनाही सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

जामताडा की, दिल्ली, हरियाना ? 
नेटफ्लिक्‍सवर नुकतीच जामताडा नावाची एक वेब सिरीज आली होती. ऑनलाइन फसवणूक करण्यात तरबेज लोकांचे तामताडा हे खरेखुरे गाव आहे. जामताडा झारखंड राज्यातील भाग आहे. देशभरातल्या एकूण सायबर क्राईमपैकी ८० टक्‍के सायबर क्राईम इथून ऑपरेट केले जातात. सायबर फसवणुकीत अवघे कुटुंब सामील असते. त्यामुळे सायबर गुन्ह्यासाठी हे गाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. शिवाय अनेकांची फसवणूक दिल्ली, हरियाना येथून येणाऱ्या कॉल्सवरूनही झाली आहे. त्यामुळे हा नवा प्रकार नेमका कुणाचा आहे, याचा शोध आवश्‍यक आहे. 

यांना अधिक धोका... 
सध्या फेसबुकवरून फसवणूक करण्यासाठी निष्क्रिय फेसबुक अकाउंट वापरले जातात. शिवाय अलीकडे मोबाईलवरून फेसबुक ऑपरेट केले जाते. त्यात एकदा लॉग इन केल्यावर आपण कधीही मोबाईलमध्ये एका क्‍लिकवर फेसबुक उघडू शकतो. त्यामुळे अनेकजण लॉग आउट करतच नाहीत. या दोन्ही प्रकारांतील व्यक्तींचे बनावट फेसबुक आयडींचा सायबर गुन्ह्यासाठी वापर होण्याची शक्‍यता अधिक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. 

खासदार अशोक नेते यांची बनावट फेसबुक आयडी तयार करून फसवणुकीच्या प्रकरणी अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशाप्रकारच्या तक्रारींचे आरोपी शोधण्यासाठी आम्ही सायबर विभागाकडे ही प्रकरणे पाठवली आहेत. 
- प्रदीप चौगावकर, ठाणेदार, गडचिरोली 

-संपादन ः चंद्रशेखर महाजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com