भंडारा : वृद्ध महिलांना लुबाडणारी महिला गजाआड

तुमसर : वृद्ध महिलांची फसवणूक करणाऱ्या आरोपी महिलेसह पोलिस अधिकारी व कर्मचारी.
तुमसर : वृद्ध महिलांची फसवणूक करणाऱ्या आरोपी महिलेसह पोलिस अधिकारी व कर्मचारी.

तुमसर (जि. भंडारा) : अशिक्षित वृद्ध महिलांना सावज बनवून शासकीय योजनांतून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांचे दागिने व रोकड घेऊन पोबारा करणाऱ्या महिलेला तुमसर पोलिसांनी अखेर मुद्देमालासह गजाआड केले.

निशिगंधा ऊर्फ ज्योती गोपीचंद रामटेके (वय 49), रा. कटीपार असे आरोपी महिलेचे नाव आहे. गेल्या चार महिन्यांत चार वृद्धांना तिने लाखोंनी गंडविले आहे. तिच्या कारनाम्याने पोलिसांना जेरीस आणले होते.

तुमसर शहरात ऑगस्ट महिन्यापासून वृद्ध महिलांच्या फसवणुकीच्या चार घटना घडल्या आहेत. या चोरट्या महिलेने 17 ऑगस्टला एका वृद्धेला गाठून मी तुम्हाला ओळखते. तुमच्यासाठी बॅंकेत पैसे आले आहेत. त्यासाठी चार हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यासाठी आग्रह धरून वृद्धेच्या अंगावरील दागिने घेऊन ती आरोपी महिला निघून गेली होती.

एका वद्धेकडून दागीनेही घेतले
12 सप्टेंबरला जुने बसस्थानक परिसरात एका वृद्ध महिलेला बांधकाम कामगारांच्या योजनेतून पेटी मिळाली. पण, पुन्हा आठ हजार रुपये मिळतात. त्यासाठी तीन हजार रुपये खर्च करावे लागतील, अशा भूलथापा तिने वृद्ध महिलेला दिल्या. गहाण ठेवण्यासाठी वृद्धेकडून दागिने हस्तगत केले. या दोन्ही प्रकरणांची पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

20 हजारांचा धनादेश मिळविण्यासाठी
14 हजार रुपये
लुटले
त्यानंतर 22 ऑक्‍टोबरलासुद्धा याच पद्धतीने दुर्गा मंदिर परिसरातून पायी जाणाऱ्या वृद्धेची या महिलेने फसवणूक केली. तुझ्या पतीचा मृत्यू झाल्यामुळे 20 हजाराचा धनादेश आला आहे. त्यासाठी आधार कार्ड व सात हजार रुपये लागतील, असे सांगून दागिने घेऊन तिने पोबारा केला.

त्यानंतर पाच नोव्हेंबरला दुपारी दुर्गानगर येथे सुलोचना घोडीचोर (वय 60) या वृद्धेला श्रावणबाळ योजनेच्या लाभाबद्दल चौकशी करून एक लाख 80 हजार रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखविले. फोटोसाठी त्या वृद्धेसह ती तिच्या घरी गेली. अर्ज आणण्याच्या बहाण्याने 14 हजार रुपये व सोन्याची गळसरी घेऊन ती फरार झाली.

यांनी केला प्रकरणाचा तपास
या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोषसिंग बिसेन, पोलिस निरीक्षक मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार टेकाम, पोलिस हवालदार चिचखेडे, माहुर्ले, रितेश बर्वे, संजय गर्जे, बापू हुलगुडे, विनोद थोटे, स्वाती नखाते, साक्षी यादव, फुलन रक्षे यांनी बजावली.

सीसीटीव्ही फुटेजवरून लागला शोध
या सर्व प्रकरणांत वृद्ध महिलांना हेरून फसवणूक करणाऱ्या महिलेने पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते. तिचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यासाठी तुमसर पोलिसांनी शहरातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन व इतर सार्वजनिक ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी महिलेची माहिती गोळा करण्यात आली.

गुप्त माहितीवरून ही महिला गोंदिया जिल्ह्यातील कटीपार येथील असल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने तिथे जाऊन महिलेला ताब्यात घेतले. तिची कसून विचारपूस केल्यावर तिने वृद्ध महिलांची फसवणूक केल्याचे कबूल केले. पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत करून आरोपी महिलेला अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com