बसचालकाने घेतले आगार नियंत्रकासमोर विष 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

प्रासंगिक करारावर सकाळी बसचालक रुजू झाला नाही. त्यानंतर कर्तव्यावर आलेल्या चालकाला आगार प्रमुखांनी कामावर रुजू केले नाही. वाहतूक नियंत्रकांनीही त्याची बाजू ऐकून घेतली नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या
बसचालकाने आगार व्यवस्थापक कार्यालयासमोर विष घेतले. त्यामुळे काही क्षणातच तो बेशुद्ध पडला. त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर तुमसर आगारातील चालक-वाहकांनी दुपारपर्यंत बसगाड्या बंद ठेवल्या.

तुमसर (जि. भंडारा) : आगारातील चालक संजय नत्थू वैद्य (वय 54, रा. खापा) याला मंगळवारी सकाळी प्रासंगिक करारावर यायचे होते. परंतु, तो वेळेवर आला नाही. त्याने आगार व्यवस्थापकांना भेटून उशिरा येण्याचे कारण
सांगितले. परंतु, आगार व्यवस्थापक युधिष्ठिर रामचौरे यांनी चालकाला कामावर रुजू न करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे चालक वैद्य याने चार वेळा आगार व्यवस्थापकांची भेट घेतली. परंतु, त्यांनी चौकशीनंतर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यामुळे चालक वैद्य हे वाहतूक नियंत्रक रचना मस्करे यांना भेटले. त्यांनीही त्याची बाजू ऐकून घेतली
नाही.

या तणावामुळे चालक वैद्य याने आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर विष घेतले. तो काही क्षणातच बेशुद्ध झाला. त्याला इतर सहकाऱ्यांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

सायंकाळपर्यंत बसफेऱ्या बंद 

ही घटना इतर एसटी कर्मचाऱ्यांत पसरली. त्यामुळे चालक व वाहकांनी बसगाड्या थांबवून घटनेचा निषेध केला. यानंतर भंडारा येथून विभाग उपनियंत्रक नागूलवार व एसटीचे इतर अधिकारी तुमसर आगारात दाखल झाले. त्यांनी चालक व वाहकांची बाजू ऐकून घेतली. परंतु, सायंकाळपर्यंत बसफेऱ्या बंद होत्या. त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. 

चौकशीनंतर कारवाई करू 

चालक संजय वैद्य यांनी विष घेतले. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. त्यात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे विभागीय उपनियंत्रक श्री. नागूलवार यांनी सांगितले. त्यानंतर चालक व वाहक बसगाड्या घेऊन रवाना झाले. 

हेही वाचा : डॉन आंबेकरविरोधात आणखी एक गुन्हा दाखल
 

आगार व्यवस्थापकाविरुद्ध रोष 

आगार व्यवस्थापक युधिष्ठिर रामचौरे यांच्या कार्यप्रणालीवर कर्मचाऱ्यांत रोष आहे. विभागीय उपनियंत्रकांच्या समोरच त्यांच्या कार्यप्रणालीवर कर्मचाऱ्यांनी प्रश्‍न उपस्थित केले. त्यांच्यामुळे कर्मचाऱ्यांची मानसिकता बिघडली आहे. यातूनच संजय वैद्य यांनी विष घेतले, असा आरोप चालक व वाहकांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhandara : The bus driver took poison in front of the aagar controller

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: