कालव्यात पडलेल्या सांबराला जीवनदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पवनी (जि. भंडारा) : गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या सांबराला जीवनदान देऊन सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. यात मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

तालुक्‍यातील धनोरा बिटमधील कम्पार्टमेंट नंबर 221 मधील नागणगाव संरक्षित वनक्षेत्रातून गोसेखुर्द धरणाचा उजवा कालवा आहे. मंगळवारी सकाळी 11च्या सुमारास या कालव्यात सांबर पडल्याचे दिसून आले. त्याबाबत मैत्रचे पदाधिकाऱ्यांना माहिती मिळाली. त्यांनी क्षेत्रसहायक ए. एस. करपते यांच्याकडे चौकशी करून माहिती घेतली. श्री. करपते त्यांच्या चमूसह कालव्यातील सांबराचा शोध घेऊ लागले. साखळी क्रमांक 6420 जवळ त्यांना कालव्यात सांबर दिसून आले. याची माहिती मैत्रच्या रेस्क्‍यू टीमला देण्यात आली.
त्यानंतर सांबराला बाहेर काढण्यासाठी मैत्रचे पदाधिकारी व वनकर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू झाले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर जाळे व दोरखंडाने बांधून सांबराला कालव्यातून बाहेर काढण्यात आले. नंतर त्याला जंगलात सुखरूप सोडून देण्यात आले. बचाव कार्यात मैत्रचे महादेव शिवरकर, अमोल वाघधरे, गजानन जुमळे, गौतम गायकवाड, अंकित रासेकर, क्षेत्रसहायक करपते, वनरक्षक खेते, जायभाये, मुंडे, कुर्झेकर, अशोक बोरकर, मोरेश्‍वर राऊत, केशव भानारकर, दुधपचारे यांनी प्रयत्न केले.

Web Title: bhandara news