
येथील जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव व अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी वॉश आउट मोहीम राबविण्याचा निर्णय बैठकीत घेतला.
भंडारा : अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस दलाकडून वॉश आउट मोहीम राबविण्यात येत आहे. यात कारधा पोलिसांनी वैनगंगा नदीच्या पात्रातील चार दारूभट्ट्या उद्ध्वस्त करून सुमारे सहा लाख रुपये किमतीचा माल जप्त केला आहे.
येथील जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव व अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी वॉश आउट मोहीम राबविण्याचा निर्णय बैठकीत घेतला. त्याबाबत कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडून पोलिस दलाला बोट उपलब्ध करून दिल्या आहेत. कारधा येथील सहायक पोलिस निरीक्षक दीपक वानखेडे यांनी वैनगंगा नदीपात्रात बोटीतून पथक रवाना करून अवैध दारूभट्ट्यांवर छापे टाकले.
सविस्तर वाचा - टूथपेस्ट'वरील रंगीत पट्ट्यांचा अर्थ तरी काय?
मकरधोकडा येथील श्यामराव जगनाडे याच्या भट्टीवर १० ड्रम, ५० मडके व १० प्लॅस्टिक ड्रममध्ये मोहफुलांचा सडवा, जळाऊ लाकडे असा एक लाख ४७ हजारांचा माल मिळाला.
आंबाडी येथील सुरेंद्र कळंबे याच्या भट्टीवर सहा लोखंडी ड्रम, ३५ मडके, २५ प्लॅस्टिकचे ड्रम भरून मोहापास व लाकडे असा एक लाख ४३ हजार रुपयांचा माल मिळाला. तिड्डी येथील रवी मेश्राम याच्या भट्टीवर आठ ड्रम, ३० मातीचे मडके व ५० प्लॅस्टिक पिशव्यांत मोहापास व लाकूड असा एक लाख ६३ हजारांचा माल मिळाला आहे. तसेच संगम पुनर्वसन येथील आकाश मेश्राम याच्या भट्टीवर सात लोखंडी ड्रम, १५ मातीचे मडके, २५ प्लॅस्टिकच्या पिशव्या, १५ प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये मोहफुलांचा सडवा आणि जळाऊ लाकूड असा एक लाख ४४ हजार ३७५ रुपयांचा माल मिळाला आहे.
हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन् मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप
मकरधोकडा परिसरात या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या असून, पोलिसांनी एकूण पाच लाख ९८ हजार २५० रुपयांचा माल जप्त केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक दीपक वानखेडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
संपादन - अथर्व महांकाळ