Bharat Bandh Updates: यवतमाळ जिल्ह्यात कास्तकारांच्या समर्थनार्थ बंद; ठिकठिकाणी राजकीय पक्षांची निदर्शने

चेतन देशमुख 
Tuesday, 8 December 2020

गेल्या दहा दिवसांपासून लाखोंच्या संख्येने पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन छेडले आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातही आंदोलन सुरू आहेत.

यवतमाळ : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी कृषी कायद्याविरोधात स्थानिक बसस्थानक चौकात विविध संघटनांनी मंगळवारी (ता. आठ) निदर्शने केलीत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांनी ही लढाई आरपारची केली असून, तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाहीत, अशी भूमिका घेतली आहे. युवा पदाधिकाऱ्यांनी नवीन बसस्थानकाजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यवतमाळसह जिल्ह्यात सर्वत्र करण्यात आलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

गेल्या दहा दिवसांपासून लाखोंच्या संख्येने पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन छेडले आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातही आंदोलन सुरू आहेत. मंगळवारी (ता.8) पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद'ला जिल्ह्यातही संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

अधिक माहितीसाठी - तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे बोलून अधिकारी युवतीचा त्याने केला पाठलाग, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

या आंदोलनात महाविकास आघाडीसह अनेक राजकीय पक्ष सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून, त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत असल्याची भूमिका यवतमाळ जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, संघटना व सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली. यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्‍यांत हे आंदोलन सुरू असून, कुठे चांगला, तर कुठे संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

या आंदोलनात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, बाळासाहेब मांगुळकर, मुंबई बाजार समितीचे संचालक प्रवीण देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, पराग पिंगळे, वसंत घुईखेडकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील, किसान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार, जिल्हा परिषदेचे सदस्य स्वाती येंडे, नगरसेवक चंद्रशेखर चौधरी, वैशाली सवाई, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशीष मानकर, यवतमाळ नगरपालिकेतील नियोजन सभापती पकंज मुंदे, दीपक धात्रक, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, नगरसेवक प्रा. डॉ. बबलू देशमुख, प्रा. घन:श्‍याम दरणे, प्रा. वर्षा निकम, ललित जैन, नगरसेवक नितीन मिर्झापुरे, दिनेश गोगरकर, सिकंदर शह, स्वामिनीचे महेश पवार, नगरसेवक पिंटू बांगर, मराठा सेवा संघाचे डॉ. दिलीप महाले यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, प्रहार, शेतकरी संघटना, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी होते.

युवा कार्यकर्त्यांनी जाळला पंतप्रधानांचा प्रतिमात्क पुतळा

केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात जिल्हाभरात आंदोलन करण्यात आली. यवतमाळ येथे प्रहार व युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा यवतमाळच्या नवीन बसस्थानकासमोर जाळला. यावेळी केंद्र शासनाविरोधात नारेबाजी करण्यात आली.

हेही वाचा - डोळ्यांना कमी दिसत असल्याने सासऱ्याने रक्कम दिली जावयाकडे; मात्र, केला विश्‍वासघात

सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचा पाठिंबा

शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेता केंद्र शासनाने शेती क्षेत्रासंदर्भातले तीन कायदे मंजूर केले आहेत. याविरोधात राज्य सरकारी कर्मचारी व निमकर्मचारी संघटनेने बंदला पाठिंबा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी नंदकुमार बुटे, मंगेश वैद्य, किशोर पोहनकर, गजानन टाके, सुभाष वानरे, आशीष जयसिंगपुरे, नितीन डफळे, गोपाल शेलोकार, अनिल राजगुरे आदी उपस्थित होते.

संपादन -अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharat band updates in Yavatmal district