रणरणत्या उन्हात भिडे गुरुजींच्या समर्थनात मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

तब्बल 15 संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी 12.15 वाजता संगम चौक येथून मोर्चा काढण्यात आला. 

बुलडाणा - कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी आज (ता. 28) शिवप्रतिष्ठानसह जिल्ह्यातील विविध अशा तब्बल 15 संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी 12.15 वाजता संगम चौक येथून मोर्चा काढण्यात आला. बुलडाण्यातील नेहमीपेक्षा तापमानात वाढ झाल्यानंतरही रणरणत्या उन्हात भिंडे गुरुजींच्या समर्थनात काढलेल्या मोर्चात समवयस्क तरुणांची लक्षणीय उपस्थिती होती. 

संगम चौकात हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत शिस्तबंध पद्धतीने मोर्चाला सुरवात करण्यात आली. संगम चौक येथून निघालेला मोर्चा जयस्तंभ चौक होत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमला होता. यावेळी भिडे गुरुजींना न्याय मिळालाच पाहिजे, जातीय विद्वेष पसरवणाऱ्यांना अटक करा आदी लिहिलेले फलक हाती घेतलेले कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. आज सकाळपासूनच जिल्हाभरातून प्रतिष्ठानसह विविध संघटनेचे धारकरी/कार्यकर्ते बुलडाणा शहराच्या दिशेनेच कूच करत होते. भगवे झेंडे आणि गांधी टोप्या या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या ओळखीसह आलेले हे सारे कार्यकर्ते चौकातून शिवरायांचा जयघोष करीत बुलडाण्याच्या रस्त्याच्या दिशेने येत होते. आज सकाळपासून शहरातील रस्त्यावर पोलिसांची कुमक दाखल झाली. या मोर्चात युवकांचा मोठा सहभाग आहे. भिडे गुरुजी विजय मोर्चासाठी वेगवेगळ्या धार्मिक संस्थांचे प्रमुखही दाखल झाले होते.

भर उन्हात रस्त्यावर चालत असताना एकारांगेत छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत इतर कुठल्याही प्रकारचे घोषणा न देता शांततामय पद्धतीने मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. मोर्चातील सहभागी तरुणांची संख्या लक्षणीय होती. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोचल्यानंतरही मोर्चामधील शेवटचाव्यक्ती हा जयस्तंभ ते संगम चौकाच्या मध्यभागपर्यंत होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा पोचल्यानंतर सहभागी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळ सदस्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत मागण्या मांडल्या. यावेळी बुलडाणा शहर ठाणेदार सुनील जाधव, धाड ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनात मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यामध्ये शीघ्रकृती दल तसेच दंगा काबू पथकाचाही समावेश होता. 

Web Title: Bhide guruji sanman morcha in buldana