अतिवृष्टीच्या धोक्‍यात भिवा"पूर'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

नागपूर : एका दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील आग्नेय (दक्षिण पूर्व) भागातील भिवापूर तालुक्‍यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नागपूर गडचिरोली मार्गावरून वाहतूक बंद झाली आहे. विशेषतः भिवापूर, उमरेड, कुही तालुक्‍यात नदीच्या पुरामुळे ग्रामस्थांना फटका बसला आहे. 

नागपूर : एका दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील आग्नेय (दक्षिण पूर्व) भागातील भिवापूर तालुक्‍यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नागपूर गडचिरोली मार्गावरून वाहतूक बंद झाली आहे. विशेषतः भिवापूर, उमरेड, कुही तालुक्‍यात नदीच्या पुरामुळे ग्रामस्थांना फटका बसला आहे. 
भिवापूर : मरुनदीला आलेल्या पुरामुळे तालुक्‍यातील अनेक गावांचा भिवापूरशी असलेला संपर्क तुटला. भिवापूर-गडचिरोली व भिवापूर-नांद हे दोन्ही महामार्ग पहाटेपासून बंद होते. परिणामी दोन्ही बाजूंची वाहतूक पूर ओसरेपर्यंत ठप्प होती. त्यामुळे वाहनांच्या नदीपासून दोन किलोमीटरपर्यंत लांबचलांब रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक दुपारी एक वाजता सुरू झाली. दरम्यान, चिखली, चिखलापार, मांगली (जगताप), रोहना, वडध, नक्षी या नांद मार्गावरील तर किन्हीकला, किन्हीखुर्द, मोखेबर्डी, किटाडी या बुडीत क्षेत्रातील गावांना पुराने वेढले होते. तसेच नदीकाठची शेतीही पाण्याखाली आली. तालुक्‍यात सरासरी 794.88 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार साहेबराव राठोड यांनी दिली. शुक्रवारी सकाळी सुरू झालेला पाऊस शनिवारी पहाटेपर्यंत सुरु होता. या संततधार पावसाने थोडीही उसंत घेतली नाही. परिणामी मरुनदीसह सर्व लहानमोठे नाले दुथडी भरून वाहत होते. नांद मार्गावरील पुलावर दोन फुटांपर्यंत पाणी चढले. नदीच्या आसपासच्या परिसरात तसेच शेतातही पाणी घुसल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला होता. दरम्यान, सावधगिरीचा इशारा म्हणून बुडीत क्षेत्रातील गावे रिकामी करण्याची सूचना प्रशासनाद्वारे देण्यात आली. बुडीत क्षेत्रातील किटाळी, किन्हीकला, किन्हीखुर्द या गावांना पुराने चहुबाजूंनी वेढा दिला असल्याने गावकऱ्यांना घरे सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र प्रशासनाने ताकीद दिल्यानंतरही अनेकांनी मुक्काम हलविला नाही. पावसाची शक्‍यता अद्याप ओसरली नसल्याने जलसंपदा विभागाने गावकऱ्यांनी बाहेर पडून पुनर्वसनस्थळी जावे यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे एक मीटरपर्यंत खुले करण्यात आले. त्यामुळे मोठ्‌या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊन पूरपरिस्थिती आटोक्‍यात आणता आली. तालुक्‍यातील शिवापूर तलाव तुडुंब भरल्याने तलावाचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे चिखलापार हे गाव पुराच्या तडाख्यात सापडण्यापासून सुरक्षित राहिले. तालुक्‍यातील मानोरा-खैरगाव मार्गावरील पुलाचा रपटा पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. पुुलावरून प्रत्येक पावसाळ्यात पाणी वाहते. त्यामुळे रपटा कमकुवत झाला होता. या पुलाची दुरुस्ती करण्याऐवजी पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. 
पूरग्रस्त किटाळीवासींचा संघर्ष 
पूरग्रस्त किटाळी गावात 50पेक्षा जास्त कुटुंबे आहेत. या प्रकल्पग्रस्तापैकी काहींचे भिवापूरजवळील तातोली या पुनर्वसनात घरांचे बांधकाम सुरू आहे. तर झुडपी जंगलात नोंद असलेल्या सहा कुटुंबांना मालकी हक्काचे पट्‌टे न मिळाल्याने गाव सोडण्याविषयी त्यांची अडचण आहे. गावाला भेट दिली असता काहीजन मेटॅडोरमध्ये सामान भरण्याची तयारी करीत होते. प्रकल्पग्रस्तांपैकी कुणालाही वाढीव कुटुंबाचा मोबदला मिळाला नाही, अशी तक्रार मनोज बकाराम गजपुरे या तरुणाने केली. वाढीव कुटुंबासाठी पात्र असलेल्या विवाहित तरुणांची संख्या 35च्या पुढे असल्याचे त्याने सांगितले. याशिवाय गावठाणाबाहेरील सहा कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही गावकऱ्यांनी उपस्थित केला. संपादित केलेल्या शेती व घरांचा योग्य मोबदला मिळाला नसल्याची या प्रकल्पग्रस्तांची ओरड आहे. त्यामुळेच अद्याप कुणीही गाव सोडलेले नाही. पुनवर्सनात आश्वासनानुसार संपूर्ण सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशीही त्यांची मागणी आहे. 
वडद येथे सात कर्मचारी अडकले 
चांपा ः शुक्रवारी कामावरून घरी परत येताना वडद नदीला मोठा पूर आल्याने नागपूरच्या वेगवेगळ्या कंपनीत काम करणारे सात जण रात्रभर अडकून पडले. 
संपूर्ण परिसर जलमय झाला, रस्ताही दिसत नव्हता. यामुळे सात कर्मचाऱ्यांनी रात्रभर पूर कमी होण्याची वाट पाहली. पूर कमी होईपर्यत नदीच्याकडेला असलेल्या झाडाखाली सात जण उपाशीपोटी रात्रभर अडकले होते. 
भिवापूर ः गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढल्याने "बॅकवॉटर'मध्ये वाढ झाली आहे. यामुळे किटाळी गावाचा संपर्क तुटला आहे. मोखाबर्डी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या या गावातील 32 कुटुंबे पुरात अडकली आहेत. "बॅकवॉटर'चा फटका तब्बल 18 गावांना बसण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhiwapur in the danger of heavy rain