मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना सायकल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

नागपूर ः महानगरपालिकेच्या सायकल बॅंक योजनेअंतर्गत मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना दहा लाख रुपये किमतीच्या सायकल वाटप या योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला. सत्तापक्षनेते संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

नागपूर ः महानगरपालिकेच्या सायकल बॅंक योजनेअंतर्गत मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना दहा लाख रुपये किमतीच्या सायकल वाटप या योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला. सत्तापक्षनेते संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

विवेकानंदनगर हिंदी माध्यमिक शाळेमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश (मुन्ना) यादव होते. व्यासपीठावर सत्तापक्षनेते व महाराष्ट्र राज्य लघुविकास मंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, क्रीडा समिती उपसभापती मनीषा कोठे, शिक्षण समिती सदस्य रिता मुळे, सुषमा चौधरी, प्रमिला मथरानी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी आदी उपस्थित होते. महापालिका विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश, स्वेटर, जोडे आदी साहित्य देत आहेत. आता सायकल प्रदान करून सुविधेमध्ये भर घालण्यात आली आहे. मागील दोन वर्षांत शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या सहकार्याने मनपा शाळा व विद्यार्थ्यांसाठी अनेक नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचे काम केल्याचे यावेळी संदीप जोशी म्हणाले. मनपाच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी बरी नसते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आवश्‍यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे कार्य विभागाकडून केले जात आहे, ही स्तुत्य बाब असल्याचेही ते म्हणाले. मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना स्वप्नवत सुविधा आता मिळू लागल्या असल्याचे यादव म्हणाले. विद्यार्थ्यांना आवश्‍यक सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रा. दिवे म्हणाले.
दहा विद्यार्थ्यांचे चेहरे फुलले
मनपाच्या आठ शाळांमधील दहा विद्यार्थ्यांना मोफत सायकल प्रदान करण्यात आल्या. लालबहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेतील अतुल करंडे, वाल्मीकीनगर हिंदी हायस्कूलमधील संजना ठाकूर, विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळेतील रीना साहू, पूजा साहू व नंदिनी चौरसिया, सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेतील वैभव शुक्‍ला, जी. एम. बनातवाला इंग्लिश हायस्कूलमधील जोहेर आदिल, नेताजी मार्केट माध्यमिक शाळेतील विकाश शर्मा, कपिलनगर हायस्कूलमधील आसीम खान, शिवणगाव माध्यमिक शाळेतील हर्षल हिवराळे या विद्यार्थ्यांना सायकल मिळाल्या अन्‌ त्यांचे चेहरे फुलले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bicycles for students in Municipal Schools