जागेचा वाद पेटला अन्‌ भावाने भावावर सपासप केले वार... 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

ज्यावेळी घटना घडली, त्यावेळी मृतअशोकची पत्नी नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. तिला घटना कळताच ती तशीच घरी पोहोचली. तोपर्यंत जखमी अशोकचा मृत्यू झाला होता.

मारेगाव (जि. यवतमाळ) : गोठ्याच्या जागेवरून दोन सख्ख्या भावांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन मोठ्या भावाने लहान भावावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. यात लहान भाऊ जागीच ठार झाला. ही घटना मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पालगाव बोटोनी येथे सोमवारी (ता. 1) सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. 

पालगाव बोटोनी येथील अशोक आत्राम (वय 43) व वसंता आत्राम (वय 49) या दोन सख्ख्या भावांमध्ये गोठ्याच्या जागेवरून नेहमी वाद व्हायचा. सोमवारी, 1 जूनच्या सकाळी 10 वाजताच्या सुमारास या दोन भावंडांत गोठ्याच्या जागेवर कंपाऊंड करण्यावरून वाद झाला. वादाचे रुपांतर नंतर भांडणात झाले. मोठा भाऊ वसंता आत्राम याने लहान भाऊ अशोक आत्राम याच्या मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. यात अशोक जागीच ठार झाला. 

अवश्य वाचा-  आईस्क्रिम देण्याच्या बहाण्याने चिमुकल्या मुलींना घरात बोलाविले आणि केले असे... 

ज्यावेळी घटना घडली, त्यावेळी मृतअशोकची पत्नी नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. तिला घटना कळताच ती तशीच घरी पोहोचली. तोपर्यंत जखमी अशोकचा मृत्यू झाला होता. या संदर्भात अशोकची पत्नी पुष्पा आत्राम यांनी मारेगाव पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी वसंता आत्राम याला ताब्यात घेतले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मारेगाव येथे आणण्यात आला. अधिक तपास मारेगाव पोलिस करीत आहेत.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big brother killed small brother due to disputed land