गडचिरोली : शहरातही बर्ड फ्लूने प्रवेश केला आहे. फुले वॉर्डातील मृत कोंबड्यांचे बर्ड फ्लूबाबतचे अहवाल सकारात्मक आले असून जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
मागील काही दिवसांत महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी बर्ड फ्लू आजाराने कोंबड्या दगावल्याचे आढळून आले. त्यानंतर गडचिरोली शहरातील फुले वॉर्डातील कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांच्या काही कोंबड्या मृत झाल्याचे आढळून आले. या मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. हा अहवाल आज सकारात्मक असल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी फुले वॉर्डातील संबंधित व्यावसायिकांच्या घराचे प्रक्षेत्र येथील कुक्कुटवर्गीय पक्षी बर्ड फ्लू रोगाने मृत्यू झाल्याने बाधित क्षेत्रास संसर्ग क्षेत्र म्हणून जाहीर केले. त्याठिकाणी केंद्रबिंदू धरून 1 किमी त्रिज्येचे संसर्ग क्षेत्र म्हणून तसेच 10 किमी त्रिज्येचे सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करून प्रतिबंधित करण्यात आले आहे. या प्रक्षेत्रापासून 1 ते 10 किमी त्रिज्येतील परिसरामधून कुक्कुट पक्ष्यांची बाहेर जाणारी वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शन, अंडी, कुक्कुटखत यास प्रतिबंध घालण्यात येत आहे. तथापि एक किमी बाधित क्षेत्र वगळून 1 ते 10 किमी क्षेत्रात निरोगी कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्री करण्यास मुभा असेल. फुले वॉर्डातील मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी एविएन इन्फ्लूएंझा ओ.आय.ई. प्रयोगशाळा भोपाळ येथे पाठविण्यात आले होते. या प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेले अहवाल सकारात्मक आले आहेत. एकूण 16 जिल्ह्यांतील नमुने तपासणीसाठी देण्यात आले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.