
जगातील विविध देशांमधून स्थलांतरित पक्षी आल्याची नोंद आहे. पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने विदेशातून यवतमाळ जिल्ह्यात आलेल्या विविध 104 प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद वनविभागाकडे आहे.
यवतमाळ : बदलत्या ऋतूप्रमाणे चारा, पाण्याच्या शोधात जगभरातील पक्षी सातत्याने स्थलांतर करतात. स्थलांतर करणारे हे पक्षी केवळ दुसऱ्या राज्यातच नव्हे तर हजारो किलोमीटरचा प्रवास करून परदेशातही जातात. आपल्या जिल्ह्यातही युरोप, अमेरिका यासह जगातील विविध देशांमधून स्थलांतरित पक्षी आल्याची नोंद आहे. पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने विदेशातून यवतमाळ जिल्ह्यात आलेल्या विविध 104 प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद वनविभागाकडे आहे.
हेही वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं
जगभरात पक्ष्यांची जैवविविधता झपाट्याने कमी होत आहे. अनेक पक्षी प्रजाती तर दूर्मीळ श्रेणीत समाविष्ट झाल्या आहेत. त्यामुळे पक्ष्यांचे संवर्धन व्हावे आणि सर्वसामान्यांपर्यंत त्यांच्या संरक्षणाची गरज काय? याची माहिती पोहोचावी, यासाठी पहिल्यांदाच पाच ते 12 नोव्हेंबर 2020 दरम्यान पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. पक्षी निरीक्षणादरम्यान जिल्ह्यात जगातील विविध देशांमधून देखील पक्षी स्थलांतर करून येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यांची नोंद पक्षीमित्र आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे झाली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत जिल्ह्यातील पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या पक्षीअभ्यासकांनुसार तब्बल 104 विविध प्रजातींचे स्थलांतरित पक्षी दरवर्षी आपल्या जिल्ह्यात येत आहेत. जिल्ह्यातील जंगल परिसर आणि जलाशये जसे धरण, तलाव या ठिकाणी त्यांचे वास्तव्य राहते. साधारणत: ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत हे स्थलांतरित पक्षी जिल्ह्यात येतात. याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यात विविध 200 पेक्षा अधिक प्रजातींच्या स्थानिक पक्ष्यांची नोंददेखील करण्यात आली आहे. यावर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या या पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यात येणारे स्थलांतरित पक्षी आणि स्थानिक पक्षी यांची नोंद करण्यात आली आहे. या माध्यमातून वनविभागाकडे उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे पक्ष्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी कार्यक्रम तयार केला जाणार आहे.
हेही वाचा - तुम्हालाही इंजेक्शनची भीती वाटतेय? मग आता काळजी नको; विद्यार्थ्याने शोधलाय हटके उपाय
पक्ष्यांची मानवी जीवनातील असलेली महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे पक्ष्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. केवळ पक्षी सप्ताहापुरता हे उपक्रम न राबवता वर्षभर सातत्याने पक्षीसंवर्धन आणि संरक्षण यासाठी कार्यक्रम राबविण्यात येतील. पक्ष्यांच्या संरक्षणासाठी वन विभागासोबतच सर्वसामान्य नागरिकांनीही पुढाकार घेऊन पक्ष्यांची आवासस्थाने संरक्षित करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
-केशव वाबळे, उपवनसंरक्षक, यवतमाळ.