esakal | अखेर त्या तीन आरोपींना न्यायालयाने ठोठावली जन्मठेप! वाचा संपूर्ण बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

court

साक्षीदार तौसिफ खान हासुद्धा घटनास्थळावर पोहोचला होता. तसेच अकीलला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असताना त्याने त्याचा भाऊ शकील शहा याला मारहाणीची हकिकत सांगितली.दवाखान्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अखेर त्या तीन आरोपींना न्यायालयाने ठोठावली जन्मठेप! वाचा संपूर्ण बातमी

sakal_logo
By
सुरज पाटील

यवतमाळ : त्यांच्यात जुने भांडण होते. ते संपवून समझोता करायचा आहे. असे सांगून १३ फेब्रुवारी २०१८ च्या मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास अकिल शहा सलीम शहा यांना आरोपींनी बोलविले होते. अकिल शहा त्या ठिकाणी आल्यानंतर शेख सलमान, शेख हुसेन यांनी अकील यास मारहाण केली. आरोपी शेख इमरान याने त्याच्याजवळील चाकूने अकीलच्या अंगावर सपासप वार केले.

साक्षीदार तौसिफ खान हासुद्धा घटनास्थळावर पोहोचला होता. तसेच अकीलला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असताना त्याने त्याचा भाऊ शकील शहा याला मारहाणीची हकिकत सांगितली.दवाखान्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

शहराच्या हद्दीमधील पोबारू ले-आऊटमध्ये जुन्या वैमनस्यातून अकील शहा सलीम शहा यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील तीन आरोपींना आज गुरुवारी (ता. २०) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

शेख इमरान ऊर्फ गोलू शेख महमूद (वय २२, रा. पोबारू ले-आउट, यवतमाळ), शेख सलमान शेख अहमद (वय २२, रा. कुरेशीपुरा) व शेख हुसेन शेख मेहबुब कुरेशी (वय ३७, रा. रहिमनगर) अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या घटनेची तक्रार शकील शहा सलीम शहा यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली. तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मिलन कोयल यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आलेत.

हेही वाचा - नागपूर ग्रामीण ब्रेकिंगः अखेर विहिरीत पडलेला एक मूषक ठरला ‘त्या’ तिघांचा काळ

त्यामध्ये न्यायालयाने प्रत्यक्ष साक्षीदार तौसफ खान हसन खान, फिर्यादी शकील शहा सलीम शहा, मृतकाचे शवविच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. डी. अलोने, तपास अधिकारी, इतर परिस्थितीजन्य पुरावे यांच्या साक्षी ग्राह्य धरून आरोपींना जन्मठेप, प्रत्येकी पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांनी सुनावली. दरम्यान, या खटल्यातील चौथा संशयित शेख अहमद यास सबळ पुराव्याअभावी दोषमुक्त करण्यात आले. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ऍड. विजय तेलंग यांनी काम पाहिले.

संपादन -स्वाती हुद्दार

loading image
go to top