भाजपच्या इच्छुकांना श्रद्धा व सबुरीचा सल्ला 

राजेश चरपे - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 19 जानेवारी 2017

नागपूर - नितीन गडकरी यांचा संघर्ष बघा. एक साधा कार्यकर्ता म्हणून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली आणि सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले. आमदार सुधाकर देशमुख यांना आश्‍वासने देऊनही तब्बल 20 वर्षे उमेदवारी देता आली नाही. फक्त संयम आणि पक्षावरच्या विश्‍वासामुळे ते यशस्वी झालेत. अशी उदाहरणे देऊन भाजपच्या वतीने हजारो इच्छुकांना श्रद्धा व सबुरीचा सल्ला दिला जात आहे. 

महापालिकेच्या 38 प्रभागांतील 151 जगांवर भाजपच्या वतीने तब्बल तीन हजार दोन इच्छुकांनी दावेदारी दाखल केली आहे. रमणा मारोती परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक 28 मधून तब्बल 57 जणांनी उमेदवारी मागितली आहे. अशीच परिस्थिती धरमपेठ-बर्डी परिसराच्या प्रभागाची आहे. येथून 52 इच्छुकांनी दावा केला आहे. प्रभाग 18 मध्येही 57 इच्छुक आहेत. प्रत्येकालाच उमेदवारी हवी आहे. विजयाचे दावेही केले जात आहे. दीडशे जागांपैकी 64 भाजपचे नगरसेवक आहेत. उरलेल्या 87 जागांचेच वाटप करायचे आहे. प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणे शक्‍य नाही. उमेदवारी नाकारली, तर नाराजी, बंडखोरी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याचा फटका भाजपला बसू शकतो. हे लक्षात घेऊन भाजपच्या वतीने विधानसभानिहाय कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून पक्षाचा इतिहास, नेत्यांनी केलेला संघर्ष, दाखवलेल्या संयमाचे बाळकडू पाजले जात आहे. कार्यकर्त्यांच्या निष्ठा, विश्‍वासामुळे आज भाजपला अच्छे दिन आल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या सर्वांना शहराचा विकास करायचा आहे. भाजपला आणखी मोठे करायचे आहे. राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करीत आहेत. नितीन गडकरी केंद्रीय मंत्री आहेत. दोन्ही नेते शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खेचून आणत आहेत. त्याकरिता महापालिका भाजपकडे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दोन्ही नेत्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ही वेळ आहे. यासाठी तुमच्या सर्वांच्या संयमाची आणि निष्ठेची महापालिकेच्या निवडणुकीत गरज आहे. सर्वांना तिकीट देणे शक्‍य नाही. तुम्हाला याची जाणीव आहे. प्रत्येकाला योग्यतेनुसार संधी मिळत असते. फक्त योग्य वेळ यावी लागते. श्रद्धा व सबुरी ठेवा. तुमचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे सांगून सर्वांची समजूत घातली जात आहे.

Web Title: BJP aspirant