भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे झाले काँग्रेसवासी | BJP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे झाले काँग्रेसवासी

भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे झाले काँग्रेसवासी

वर्धा : भाजपमधील सर्वामान्यांचा चेहरा म्हणून ओळख असलेले जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी पदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्य प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. त्यांच्या या काँग्रेस प्रवेशाने जिल्ह्यात काँग्रेसला आणखी बळ मिळणार असल्याचे पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आले आहे. लवकरच डॉ. गोडे यांना योग्य जबाबदारी देणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले

डॉ. शिरीष गोडे यांनी दोन महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजीनामा देत असल्याचे पत्र पाठविले होते. त्यावेळी पाटील यांनी खासदार रामदास तडस यांच्या मार्फत डॉ. गोडे यांची समजूत काढली होती. मात्र, पक्षात त्यांची घुसमट कायमच होती. यामुळे त्यांनी काँग्रेसच्या जनजागरण यात्रेदरम्यान सोमवारी (ता. १५) सकाळच्या सुमारास करंजी (भोगे) येथे पालकमंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेस प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच के पटेल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री सुनील केदार, आमदार रणजित कांबळे, ज्येष्ठ नेत्या चारुलता टोकस, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांची उपस्थिती होती.

हेही वाचा: ST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लालपरीचे कार्तिकी यात्रेतील उत्पन्न 'लॉक'

राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या डॉ. शिरीष गोडे यांनी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला होता. डॉ. गोडे हे दोनवेळा भाजप जिल्हाध्यक्ष होते. गत काही दिवसांपासून डॉ. गोडे भाजपच्या कार्यप्रणालीवरून अस्वस्थ होते. काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजीनामाही पाठवला होता. कार्यवाहीच आश्वासन मिळाल्यानतर डॉ. गोडे यांनी वेट अँड वॉच केले. या कालावधीत डॉ. गोडे यांच मन वळवण्याचा प्रयत्न झाला. पण बदल दिसत नसल्याचं सांगत अखेर डॉक्टर गोडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

डॉ. गोडेंची राजकीय पार्श्वभूमी

काँग्रेसचे खासदार राहिलेल्या संतोषराव गोडे यांचे चिरंजीव असलेल्या डॉ. गोडे यांनी आरोग्य खात्यात वरिष्ठ पद भूषवून राजीनामा देत काँग्रेसचे राजकारण सुरू केले होते. मात्र, संधी न मिळाल्याने त्यांनी बसपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविली होती. पुढे भाजपामध्ये प्रवेश केल्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी खेडोपाडी भाजप मजबूत करण्याचे कार्य केले. त्यांच्या कार्याची प्रशंसा भाजपचे नेतेही करायचे.

"मी २००८ पासून भाजपमध्ये काम करीत होतो. त्यावेळचा पक्ष आणि आताचा पक्ष यात मोठा फरक आहे. शेतकरी आंदोलनाबाबत भाजपच्या भुमिकेमुळे राजिनामा देत आहे. गोरगरिबांचा आणि सर्वधर्म समभावच्या काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आहे. काँग्रेसमध्ये येताच स्वगृही आल्याचे जाणवत आहे."

- डॉ. शिरीष गोडे

loading image
go to top