भाजपच्या खासदाराने केली नियमांची ऐशीतैशी, नंतर काढावा लागला पळ, पण का?

अभिजित घोरमारे
Saturday, 8 August 2020

भंडारा - गोंदियाचे खासदार सुनील मेंढे विदर्भ हाऊसिंग कॉलनीमधील लुक्स सलुनमध्ये दाढी-कटींग करत होते. तेवढ्यात काही लोकं तेथे आले आणि त्यांना बघून काहीही न बोलता खासदारांनी चक्क तेथून पळ काढला.

भंडारा : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून तसेच स्थानिक नेत्यांकडून सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळा, दुकाने निर्धारित वेळेतच बंद करा इत्यादी आवाहने केली जात आहेत. मात्र भंडारा गोंदियाच्या भाजपच्या खासदारांनी या सर्व नियमांना केराची टोपली दाखवली आहे. विशेष म्हणजे त्यांनी नियम तोडल्याचे लक्षात येताच त्यांना तिथून पळ काढण्याची वेळ आली आहे.      

भंडारा - गोंदियाचे खासदार सुनील मेंढे विदर्भ हाऊसिंग कॉलनीमधील लुक्स सलुनमध्ये दाढी-कटींग करत होते. तेवढ्यात काही लोकं तेथे आले आणि त्यांना बघून काहीही न बोलता खासदारांनी चक्क तेथून पळ काढला. आता तुम्ही म्हणाल  त्यात गैर काय? सलून सुरु झाले असल्यामुळे त्यांनी दाढी कटिंग केली असावी. पण इथे प्रकरण वेगळेच आहे. 

उघडून तर बघा - जो खाईल तूप त्याला येईल रूप... वाचा तूप खाण्याचे फायदे

..आणि त्यांनी काढला पळ 

खासदार सुनील मेंढे विदर्भ हाऊसिंग कॉलनीमधील लुक्स सलुनमध्ये दाढी-कटींग करीत होते खरे पण ती वेळ होती रात्री ११ वाजताची. सायंकाळी सात वाजेनंतर दुकाने बंद करावी, असा नियम सरकारने घालून दिला आहे. या नियमाची खासदारांनीच ऐसीतैसी केली. काही जागरुक नागरिकांनी ही चूक त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला, असता त्यांनी काहीही न बोलता तेथून पळ काढला. 

खासदारांनाही द्या शिक्षा 

भंडारा येथे खासदारांनीच कोविडच्या नियमांची ऐसीतैसी केल्यामुळे लोक संतापले आहेत. सामान्य नागरिकावर तत्काळ कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यामुळे आता नियम तोडणाऱ्या खासदार सुनील मेंढेंनाही शिक्षा झाली पाहिजे, असे लोकांचे म्हणणे आहे. नागरिकानी भंडारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून खासदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

नियम त्यांना लागू होत नाहीत का

खासदार सुनील मेंढे यांनी आमदार, जिल्हाधिकारी आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन कोरोनाच्या नियंत्रणासाठी नियमावली तयार केली. स्वतः मात्र रात्री ११ वाजता सलुनमध्ये दाढी, कटींग केली. त्यांनी जनतेसाठी घालून दिलेले नियम त्यांना लागू होत नाहीत का, असा संतप्त सवाल लोकं आता करत आहेत.

हेही वाचा - ती ढसा ढसा रडत होती; कारण, सर्व मागण्या पूर्ण केल्यावरही त्याने बोहल्यावर चढण्यास दिला नकार

खासदारांनी राजीनामा द्यावा

जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांनी खासदारांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करावी. पण त्याहीपूर्वी नैतिक जबाबदारी स्विकारुन सुनील मेंढे यांनी आपल्या दोन्ही पदांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP from bhandara did not follow rules of corona