भाजपविरोधी पक्षांसोबत महाआघाडी - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

नागपूर - आगामी विधानसभा-लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपविरोधी पक्षांसोबत महाआघाडी करण्याच्या दृष्टीने काँग्रेस विचार करीत आहे, अशी माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज (गुरुवार) दिली. मात्र, त्याचवेळी भाजपविरोधी भूमिका निभावणारे शिवसेना, मनसे आणि एमआयएम या पक्षांना महाआघाडीचे निमंत्रण देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर - आगामी विधानसभा-लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपविरोधी पक्षांसोबत महाआघाडी करण्याच्या दृष्टीने काँग्रेस विचार करीत आहे, अशी माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज (गुरुवार) दिली. मात्र, त्याचवेळी भाजपविरोधी भूमिका निभावणारे शिवसेना, मनसे आणि एमआयएम या पक्षांना महाआघाडीचे निमंत्रण देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने नागपुरात आले असताना अशोक चव्हाण यांनी पत्रकार क्‍लबला भेट देऊन संवाद साधला. महाराष्ट्रात प्रभाव असलेले मायावती, प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांच्या पक्षांना प्रामुख्याने विचारात घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘राहुल गांधी आणि शरद पवार यांची आघाडीच्या संदर्भात चर्चा झाली आहे. मी स्वतः प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. पक्षश्रेष्ठींना आपला प्रस्तावही आम्ही पाठवला आहे. 

येत्या काही दिवसांत काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढविण्यासंदर्भात निर्णय होईल. निवडणूक जिंकण्याची क्षमता तपासूनच जागांचे वाटप होईल आणि यामध्ये विशेषत्वाने महाआघाडीतील जवळपास दहा पक्षांचाही विचार करण्यात येईल,’ असे खासदार अशोक चव्हाण म्हणाले. 

नागपूर शहर काँग्रेसमधील गटबाजी अद्याप थांबलेली नाही, अशा परिस्थितीत निवडणुकीचे गणित कसे साधणार, या प्रश्‍नावर ‘वैचारिक मतभेद प्रत्येकच पक्षात आहेत, तसे आमच्यातही आहेत. येत्या काळात त्यावर तोडगा काढण्यात येईल. काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या नेत्यांचा नक्कीच विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले. यावेळी आमदार डी. पी. सावंत, प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, शहराध्यक्ष विकास ठाकरे, प्रा. बबनराव तायवाडे यांची उपस्थिती होती.

शिवसेना सत्तेसाठी लाचार
नाणार प्रकल्पाचा दाखला देऊन शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे, अशी टीका त्यांनी केली. त्याचवेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा किंवा सेनेने सत्तेतून बाहेर पडावे, असे आवाहनही त्यांनी केले.सरकारची संशयास्पद भूमिका
प्रकल्पग्रस्तांना जमीन मिळते व रातोरात पोलिस बंदोबस्तात बिल्डरकडे हस्तांतरित होते, ही बाब अत्यंत गंभीर असून यामध्ये सरकारची भूमिका संशयास्पद आहे. राजाश्रय असल्याशिवाय असे व्यवहार होत नाहीत, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला. त्याचवेळी मुख्यमंत्री असताना अशा पद्धतीचा कुठलाही प्रस्ताव आपल्याकडे आला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माणिकरावांना खासगीत सल्ला
माणिकराव ठाकरे यांना लोकसभा निवडणूक लढविण्यास सांगणार का, या प्रश्‍नावर, ‘त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, असेच मी सुचवेन. परंतु, मित्र म्हणून माझा सल्ला त्यांना मी खासगीतच सांगणार आहे,’ अशी कोटीही त्यांनी केली.

Web Title: BJP Oppose Party Mahaaghadi Ashok Chavan Politics