Trying To Erase History : नाना पटोले म्हणाले, भाजप व संघाकडे ना इतिहास ना भविष्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nana patole

नाना पटोले म्हणाले, भाजप व संघाकडे ना इतिहास ना भविष्य

वर्धा : भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इतिहास नाही आणि भविष्यही नाही. त्यामुळे ते इतिहासाची मोडतोड करून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी स्वातंत्र्याचा इतिहास आणि काँग्रेस पक्षाचा विचार ग्रामीण भागापर्यंत नेण्याची गरज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

वर्धेच्या सेवाग्राम आश्रमात १२ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चारदिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य सचिन राव, वर्धेचे पालकमंत्री सुनील केदार, माजी मंत्री आमदार रणजित कांबळे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सचिव वामशी रेड्डी, महाराष्ट्र सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम. संदीप, राष्ट्रीय सचिव आणि पंजाबचे सहप्रभारी हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदूरकर उपस्थित होते.

हेही वाचा: ग्रीन मोनोकनी बिकनीमध्ये अनुष्काचा फोटो पाहून विराट म्हणाला...

पटोले म्हणाले, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता. काँग्रेस पक्ष स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढत होता. त्यावेळी ब्रिटिशांच्या बाजूने उभे असणारे आज लोकांना राष्ट्रवादाचे धडे देत आहेत. ते सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही म्हणत आहेत. शिबिरात ३४ राज्यांतून आलेले तुम्ही सर्व काँग्रेस पदाधिकारी या वैचारिक लढ्यातील महत्त्वाचे सैनिक आहात. हे शिबिर विचारांची शिदोरी देणारे ठरले असून, प्रत्येक जिल्ह्यात असे प्रशिक्षण शिबिर घेणार असल्याचे पटोले म्हणाले.

शिबिरार्थींनी चार दिवसांच्या प्रशिक्षणातील अनुभवांची माहिती दिली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री बी. के. हरिप्रसाद, खासदार राजीव गौडा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत, दिलीप रे, ज्येष्ठ गांधीवादी व सेवाग्रामचे माजी अध्यक्ष मा. म. गडकरी, डी. पी. राय, दीपक बाबरिया यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव यांनी माहिती दिली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व पंजाबचे सहप्रभारी हर्षवर्धन सपकाळ यांनी संचालन केले.

हेही वाचा: या शहरात खेळला जाईल अंतिम सामना; ७ शहरात होणार ४५ सामने

घरोघरी दिली माहिती

आज सकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत वर्धा जिल्ह्यातील कारंजी (भोगे) गावात महागाईविरोधात प्रभातफेरी काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले. रविवारी सर्व नेते कारंजा गावात मुक्कामी होते. सर्व नेत्यांची घरोघरी जाऊन महागाई व इंधन दरवाढीला केंद्र सरकारचे चुकीचे धोरण कसे कारणीभूत आहे, याबाबत सांगितले. वर्धेचे पालकमंत्री सुनी केदार, आमदार रणजित कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष चारुलता टोकस, प्रदेश सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी प्रभात फेरीत सहभागी झाले.

loading image
go to top