पदवीधरमधील पराभव लागला भाजपच्या जिव्हारी; झाली जुन्या माणसांची आठवण; होणार मोठे फेरबदल 

अभिजित घोरमारे
Friday, 18 December 2020

जिल्ह्यात झालेल्या फेरबदलानंतर भाजप पुन्हा मजबूत होईल, असे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटते. हा फेरबदल काहींच्या जिव्हारी लागला, तर काही कार्यकर्यांमध्ये आनंद साजरा होत आहे. माजी आमदार चरण वाघमारे यांची उमेदवारी कापून नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांना तिकीट देण्यात आली होती.

भंडारा ः भारतीय जनता पक्षाला नागपूर पदवीधर मतदारसंघात पराभव झाल्यानंतर जुन्या माणसांची पारख झाली आहे. आमदार परिणय फुके यांचे निकटतम मानले जाणारे प्रदीप पडोळे यांच्याकडून जिल्हाध्यक्षपद काढून ते माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटातील ज्येष्ठ कार्यकर्ते शिवराम गिरीपुंजे यांना देण्यात आले आहे. या फेरबदलाने फुके यांची पिछेहाट झाल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यात झालेल्या फेरबदलानंतर भाजप पुन्हा मजबूत होईल, असे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटते. हा फेरबदल काहींच्या जिव्हारी लागला, तर काही कार्यकर्यांमध्ये आनंद साजरा होत आहे. माजी आमदार चरण वाघमारे यांची उमेदवारी कापून नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांना तिकीट देण्यात आली होती. हा राग मनात धरुन वाघमारेंनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली. परिणामी भाजपच्या अधिकृत उमेदवाराला पराभवाचे तोंड बघावे लागले. नंतर नंतर चरण वाघमारे यांचा पक्षात पुर्नप्रवेश झाला. तेव्हाच पडोळे यांची गच्छंती होणार, असे बोलले जात होते आणि तीच चर्चा आताही सुरू आहे.

हेही वाचा - सालेकसातील शेतात आढळला मांजरीसारखा दिसणारा प्राणी; जवळ जाऊन बघितले असता अंगाचा उडाला थरकाप

येत्या जिल्हापरिषद व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप कामाला लागली असून संघटनात्मक दृष्ठीने अनेक फेरबदल सुरु केले आहेत. भाजपाच्या सुरुवातीपासून पक्षात असललेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक शिवराम गिरिपुंजे यांना जिल्हाध्यक्ष पद दिले गेले आहे. गिरीपुंजे यांचे सहकार क्षेत्रात मोठे नाव असून राजकीय दृष्टीने साकोली विधानसभा मतदारसंघात त्यांनी दोन वेळा निवडणूक लढावलेली आहे. त्यामुळे जेष्ठ अनुभवी नेत्याला जबाबदारी दिल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.

भंडारा जिल्हात गेल्या विधानसभा निवडणुकीपासून तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चरण वाघमारे यांची उमेदवारी कापून तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांना तिकीट देण्यात आली. यात परिणय फुके यांच्या गटाचा हात असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे नाराज माजी आमदार चरण वाघमारे यांनी पक्षादेश झुगारत अपक्ष निवडणूक लढविली. मात्र दोघांनाही यात अपयश आले. अन् राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजू करमोरे निवडून आले. त्यांनतर चरण वाघमारे यांनी विकास फाऊडेशन स्थापन करत जिल्हाभर आपले संघटन वाढवण्यास सुरुवात केली.

क्लिक करा - पवित्र नात्याला काळिमा! सासऱ्याने केला सुनेवर अत्याचार; नातवाला जीवे मारण्याची दिली धमकी

दरम्यान चरण वाघमारे शिवसेनेत जाणार याबाबत चर्चा सुरु झाल्याने देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भाजपचे प्रदेश सरचिटणीस बावनकुळे यांच्यामार्फत वाघमारेंना पक्षात परत आणले. असे असले तरी चरण वाघमारे पक्षात आल्यावर प्रदीप पडोळे यांचे पद निश्चित जाईल, याची चर्चा जिल्हाभर रंगली आणि काल प्रदीप पडोळे यांचे जिल्हाध्यक्ष पद जाऊन चरण वाघमारे यांचे सहकारी शिवराम गिरिपूंजे यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडली. त्यामुळे आता भाजपमधील संघटनात्मक बदल अजून कसे-कसे होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP will make important changes after loosing elections