Vidhan Sabha 2019 : भाजपच्या 20 टक्के आमदारांना डच्चू?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

संपूर्ण राज्यात "सिटिंग-गेटिंग' फॉर्म्युला लागू करण्यात येणार नाही. याकरिता पाच वर्षांतील संबंधित आमदारांची कामगिरी तसेच संघटनेला दिलेले योगदान तपासले जाणार आहे. एवढेच नव्हे, तर त्याची कार्यकर्ता व जनतेसोबतची वागणूकही बघितली जाणार आहे.

विधानसभा 2019 : नागपूर : भाजपने यंदा सुमारे 20 टक्के आमदारांना डच्चू देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक विद्यमान आमदारांच्या पोटात गोळा आला असून, अनेक जण आपले पाच वर्षांचे रिपोर्ट कार्ड घेऊन बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

Vidhan Sabha 2019:दिवाळीत फुटणार निवडणुकांचे फटाके; 'या' आहेत तारखा

भाजप-सेना युती होण्याची शक्‍यता असली, तरी ती तुटल्यास सर्वच जागा अतिशय ताकदीने लढण्याचा निर्णय घेतला आहे. खासकरून विदर्भातील 62 जागांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने येथे पक्षाला कुठलाही धोका पत्करायचा नाही. बारापैकी बाराही जागा जिंकण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे. याकरिता नागपूरच नव्हे, तर संपूर्ण राज्यात "सिटिंग-गेटिंग' फॉर्म्युला लागू करण्यात येणार नाही. याकरिता पाच वर्षांतील संबंधित आमदारांची कामगिरी तसेच संघटनेला दिलेले योगदान तपासले जाणार आहे. एवढेच नव्हे, तर त्याची कार्यकर्ता व जनतेसोबतची वागणूकही बघितली जाणार आहे.

Vidhan Sabha 2019 : अवघ्या 30 दिवसांत 5 वर्षांच्या कामाचा निकाल

उमेदवार निवडण्यासाठी भाजपतर्फे तीन पातळींवर सर्व्हे केला जात आहे. एक सर्व्हे केंद्रीय पातळीवरून केला जात आहे. दुसरा पक्षातर्फे, तर काही खासगी संस्थांच्या माध्यमातून आमदार व इच्छुक उमेदवारांविषयीचे मत जाणून घेतले जात आहे. हा सर्व्हे जवळपास पूर्ण झालेला आहे. तिकीट वाटप करताना तीनही स्तरांवरच्या सर्व्हेचा आधार घेतला जाणार आहे. केवळ आमदार आहे म्हणून त्याला तिकीट दिले जाणार नाही. मात्र, तिकीट वाटप करताना मुद्दाम कोणाचे तिकीट कापले जाणार नसल्याचे एका नेत्याने सांगितले. दोन ते चार वेळा आमदार राहिलेल्या, वयाची सत्तरी ओलांडलेल्या आमदारांना विश्रांती देऊन नवे चेहरे द्यावे, असेही मत मांडले जात आहे.

सेनेला मोजक्‍याच जागा
दोनच दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा नागपूला येऊन गेले. राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धेही त्यांच्यासोबत होते. स्मृतिमंदिर येथे विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली. त्यांचेही मत जाणून घेतले. यात बहुतांश जणांनी विदर्भात शिवसेनेसोबत युतीची गरज नसल्याचे मत मांडले. त्यामुळे युती झाल्यास विदर्भात शिवसेनेच्या वाट्याला मोजक्‍याच जागा येण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP will not give ticket to 20 percent MLA in Maharashtra Vidhansabha 2019 elections