file photo
file photo

Maharashtra vidhansabha 2019 : मताधिक्‍य राखण्याचे भाजपपुढे आव्हान

नागपूर : लोकसभा निवडणुकीत मिळालेली मतांची आघाडी विधानसभेत कमी होत असल्याचे मागील निवडणुकीतील आकडेवारीने स्पष्ट केले. सहाही मतदारसंघात वरचष्मा असलेल्या भाजपपुढे लोकसभा निवडणुकीत मिळालेली मतांची आघाडी कायम राखण्याचे आव्हान आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत सहाही जागांवर भाजपने ताबा मिळवला असला तरी त्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या तुलनेत मते घटली होती.
2014 मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपने "क्‍लिन स्वीप' केले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी यांना पाच लाख 87 हजार 787 मते मिळाली होती. मात्र, सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपला मिळालेल्या मतांची बेरीज केल्यास मताधिक्‍य 51 हजारांनी कमी झाले होते. लोकसभेतील मतांची आघाडी कायम राखण्यात भाजपला अपयश आले होते.
लोकसभा निवडणुकीत दक्षिण नागपूर मतदारसंघात भाजपला एक लाख 5 हजार मते पडली होती. त्यानंतर काही महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला दक्षिणेत 81 हजार 224 मतांवर समाधान मानावे लागले होते. पूर्व नागपूर मतदारसंघात भाजपने लोकसभेत एक लाख 13 हजार मते घेतली; मात्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला येथे 99 हजार 136 हजार मते मिळाली. मध्य नागपूर मतदारसंघात गडकरी यांनी 94 हजार 164 मते मिळवली होती. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला येथे 87 हजार 356 मतांवर समाधान मानावे लागले.
लोकसभेत पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पदरात 93 हजार मते पडली होती तर विधानसभा निवडणुकीत भाजपला येथे 86 हजार 500 मते मिळाली. लोकसभेत दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघात भाजपला एक लाख 65 हजार 525 मते मिळाली होती. विधानसभा निवडणुकीत एक लाख 13 हजार 918 मते भाजपला मिळाली. उत्तर नागपूर विधासभा मतदारसंघात गडकरी यांना 74 हजार मते मिळाली होती व अवघ्या काही महिन्यात विधानसभेत भाजपला 68 हजार 905 हजार मते पडली. लोकसभेत भाजप-सेना युती होती तर विधानसभेत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्याने 51 हजार मते कमी भेटल्याचा निष्कर्ष त्यावेळी भाजपमधील काही मंडळींनी काढला होता. या निष्कर्षामुळे आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युती न झाल्यास भाजपपुढे लोकसभेतील मताधिक्‍य टिकविण्याचे आव्हान आहे. नुकताच मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दक्षिण-पश्‍चिम, दक्षिण, पूर्व, पश्‍चिम या चार मतदारसंघात लाखांवर मते घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com