रेमडेसिव्हिरचा काळाबाजार थांबता थांबेना! अमरावतीत दोन डॉक्‍टरांसह सात जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेमडेसिव्हिरचा काळाबाजार थांबता थांबेना! अमरावतीत दोन डॉक्‍टरांसह सात जणांना अटक

रेमडेसिव्हिरचा काळाबाजार थांबता थांबेना! अमरावतीत दोन डॉक्‍टरांसह सात जणांना अटक

अमरावती : कोरोनाबाधितांसाठी (Corona Patients) संजीवनी असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा (Remdesivir Injection) अमरावतीत (Amravati News) गोरखधंदा होत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणात विशेष पथक तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Amravati police crime Branch) मोठी साखळी शोधून काढली. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले. (Black market of Remdesivir in Amravati 9 arrested)

हेही वाचा: कोरोनाची लस घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेवणं योग्य आहे का? जाणून घ्या डॉक्टरांचं मत

600 रुपयांचे इंजेक्‍शन 12 हजार रुपयांमध्ये विकण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी पोलिसांच्या विशेष पथक तसेच गुन्हे शाखेला निर्देश दिल्यावर त्यांनी सापळा रचला. बनावट ग्राहक बनून संबंधितांच्या फोनवर संपर्क साधण्यात आला. त्यावरून सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधील कक्षसेवक शुभम शंकर किल्लेकर (वय 24, रा. वडाळी) व शुभम सोनटक्के (वय 24, रा. चपराशीपुरा) हे कॅम्प कॉर्नर येथे इंजेक्‍शन विकण्यासाठी आले,

त्यावेळी पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्या ताब्यातून दोन रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन जप्त करण्यात आले. त्यांनी भातकुली प्राथमिक आरोग्यकेंद्र परिसरात डॉ. अक्षय मधुकर राठोड यांच्याकडून इंजेक्‍शन मिळाल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी तातडीने डॉ. राठोड यांच्याकडे मोर्चा वळविला. त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या वाहनातून एक इंजेक्‍शन जप्त करण्यात आले.

त्याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी इर्विन रुग्णालयातील एका परिचारिकेचे नाव सांगितले. तिला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली व झडती घेतली असता तिच्याकडून एक इंजेक्‍शन जप्त करण्यात आले. तिला विचारणा केली असता तिने संजीवनी कोविड हेल्थ सेंटर येथील डॉक्‍टर व लॅब टेक्‍निशियन इंजेक्‍शन पुरवीत असल्याची माहिती दिली. त्यावरून लॅब टेक्‍निशियन अनिल पिंजरकर तसेच डॉ. पवन दत्तात्रेय मालुसरे यांच्याकडून पाच इंजेक्‍शन जप्त करण्यात आले. डॉ. मालुसरे हे तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सहा जणांचा चौकशी सुरू असतानाच दुपारी पुन्हा एकाला पोलिसांनी अटक केली. त्यामुळे याप्रकरणात एकूण अटक संशयित आरोपींची संख्या सातवर पोहचली आहे, असे पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सांगितले.

हेही वाचा: उदासीन वैद्यकीय यंत्रणेचा दुसरा बळी; आठ महिन्यांच्या गरोदर महिलेचा मृत्यू

15 लाखांचा माल जप्त

याप्रकरणात दहा इंजेक्‍शन, दोन कार, तीन दुचाकी, असा एकूण 15 लाख 14 हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात दोन डॉक्‍टरांसह सात जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Black market of Remdesivir in Amravati 9 arrested)

Web Title: Black Market Of Remdesivir In Amravati 9

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Amravati
go to top