अमरावतीत सुरू आहे रेशनच्या तांदळाचा काळाबाजार

rice.j
rice.j

अचलपूर (जि. अमरावती) : कोरानोने अनेकांच्या हाताचे काम काढून घेतले. अनेकांसमोर आर्थिक अडचण उभी राहिली, त्यामुळे सरकारने गरीबांना दोन वेळचे खायला तरी मिळावे, या उद्देशाने अनेक योजना सुरू केल्या. स्वस्त धान्य योजना सुरू केली, मात्र रेशनचे हे धान्य गरीबांच्या पोटात जाण्याऐवजी त्याचा काळाबाजार सुरू असल्याने सरकारच्या या योजनेला हरताळ फासला जात असल्याचे लक्षात येते.
त्यातच कोरोनाच्या संकटात रेशनवरील धान्य वाटपासंबंधी आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच यातील तांदळाचा काळाबाजार केला जात असल्याचे समोर आले आहे. अचलपूर तालुक्‍यातून तब्बल 400 पोते रेशनचा तांदूळ जिल्ह्याबाहेर काळ्या बाजारात विकण्यासाठी निघालेला ट्रक पोलिसांनी पकडला. तो तांदूळ सरकारचाच असल्याचे पुरवठा अधिकाऱ्यांच्या चौकशीत स्पष्ट झाले. परिणामी रात्री उशीरा अचलपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून गोरगरिबांना मोफत तांदूळ वाटप करण्यात आला. या तांदळाच्या वाटपात दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात हेराफेरी केल्याचे बोलले जात होते. असे असतानाच बुधवारी (ता.24) सायंकाळी परतवाडा येथून ट्रकमध्ये बाहेर जिल्ह्यात जाणारे तांदळाचे 400 अवैध पोते विशेष पोलिस पथकाने चांदूरबाजार नाक्‍यावर पकडले. पोलिस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर परतवाड्यावरून गोंदियाकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम.एच. 17 ए.जी. 3341 ची तपासणी केली असता ट्रकमध्ये 400 तांदळाचे पोते आढळून आले.

ट्रक चालकास तांदूळ कुठून आणला याबाबत विचारणा केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्‍या दाखवताच चालकाने 1 ते 2 किलोमीटर अंतरावर असलेले गोदाम दाखविले. हे गोदाम सरमासपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतल्या एमआयडीसीत असून बंडू अग्रवाल यांच्या मालकीचे आहे. विशेष म्हणजे गोडाउनची तपासणी केली असता गोडाउनमध्येही 350 तांदळाचे पोते आढळून आले. एकूण तांदळाचे 750 पोते पोलिसांनी जप्त केले, त्याची किंमत अंदाजे 22 लाख आहे.
गुणवत्ता नियंत्रक व पुरवठा अधिकारी यांच्याकडून तपासणी करून सदर प्रकरणात कारवाई करण्यात आली. पकडलेला तांदूळ सरकारचाच असल्याचे स्पष्ट झाले. सदरची कारवाई जिल्हा पोलिस पथकातील अजय आकरे, स्वप्नील तंवर, सय्यद अजमत, पंकज फाटे, संदीप देशमुख यांनी केली.
सविस्तर वाचा - शाळा सुरू पण घंटा वाजणार नाही
तांदूळ सरकारचाच
सदर पकडलेला तांदूळ सरकारचाच असल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले आहे. अचलपूर पोलिस ठाण्यात जीवनावश्‍यक वस्तू कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच गोदाम सील करण्यात आले आहे.
शैलेश देशमुख, पुरवठा अधिकारी, अचलपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com