भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक प्रगतीसाठी वळले या धानाकडे; बाजारात आहे अधिक भाव, वाचा...

Black rice farming in Bhandara district now
Black rice farming in Bhandara district now

साकोली (जि. भंडारा) : काळ्या तांदळाला अधिक भाव मिळत असल्यामुळे हे वाण शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीकरिता एक वरदान ठरणार आहे. तसेच ते सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मात्र, शासनाने अद्याप या काळ्या तांदळाकरिता हमीभाव जाहीर केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर अल्प प्रमाणात काळ्या तांदळाची लागवड केली आहे. यातून चांगले उत्पादन मिळणार असल्याची आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

काळ्या तांदळाची देशातील कित्येक प्रांतात पूर्वीपासून लागवड होत आहे. भारताच्या उत्तर पूर्व विभागात त्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी वेगळे वाण म्हणून या धानाचे बियाणे मिळवले. त्याची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केल्यामुळे इतर शेतकऱ्यांतही काळ्या तांदूळ या वाणाची माहिती झाली आहे.

जिल्ह्यात 50 ते 100 हेक्‍टरमध्ये काळ्या तांदळाची लागवड वाढत आहे; तरीही त्याची शासन स्तरावर नोंद झाली नाही. त्यामुळे शासनाने काळ्या तांदळाकरिता हमीभाव जाहीर केला नाही. यावर्षी साकोली तालुक्‍यात 40 ते 50 हेक्‍टरमध्ये या काळ्या तांदळाची लागवड केली आहे. या वाणाचा उत्पन्नाचा कालावधी 120 ते 160 दिवस आहे. परंतु, मॉन्सूनच्या लहरीपणावर मात करण्याकरिता सिंचनाची सोयी असणे गरजेचे आहे.

वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे नाव

देशातील ओरिसा, पश्‍चिम बंगाल, झारखंड, मणिपूर या प्रांतामध्ये काळ्या तांदळाचे सर्वांत जास्त प्रमाणात सेवन केले जाते. वेगवेगळ्या प्रांतात हे तांदूळ चाकहायो (मणिपूर), करायकावानी (तामिळनाडू), काळाभात (महाराष्ट्र), कालाभाती (ओरिसा), वरना ब्लॅक (उत्तर-पूर्व राज्यात) अशा नावांनी प्रचलित आहे.

शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होणार

गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड या राज्यांमध्ये काळ्या तांदळाची लागवड करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस शेतकरी नवीन तांदळाच्या जातीची लागवड करत आहेत. काळा-लाल व पांढरा तांदूळ या वाणांची लागवड करण्याकडे त्यांचा कल आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाअंतर्गत साकोली येथील कृषी संशोधन केंद्रातून पीकेव्ही रेड (एसकेएलआरआर-1) हे बारीक वाणाचे लाल तांदूळ विकसित केले आहे. त्याचे प्रतिहेक्‍टरी 40 ते 45 क्विंटल उत्पन्न होते. या तांदळात झिंक व लोहाचे प्रमाण चांगले आहे. यावर्षी तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून जवळपास 50 ते 60 हेक्‍टरमध्ये लाल व काळ्या तांदळाची लागवड केली आहे. बाजारात अधिक भाव मिळत असल्याने त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्याची आशा आहे.

विविध आजारांवर गुणकारी

काळ्या तांदळामध्ये मुबलक प्रमाणात प्रतिजैविके, प्रथिने, फायबरचे प्रमाण आहे. त्यामुळे या तांदळाचा उपयोग किडनी, लिव्हरसाठी चांगला समजला जातो. मधुमेह व हृदयरोगाच्या रुग्णांसाठी या तांदळाचा भात उपयुक्त आहे. तसेच मेंदूच्या वाढीसाठीसुद्धा हे तांदूळ उपयुक्त आहे. या तांदळाच्या नियमित सेवनामुळे त्वचा, केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे. या तांदळामध्ये जीवनसत्त्व ई, लोह मोठ्या प्रमाणात आहे. अर्धा कप तांदूळ डायरियावर प्रतिबंध करण्यासाठी उपयुक्त आहे. प्रती 100 ग्रॅम काळ्या तांदळामध्ये 8.5 ग्रॅम प्रथिनांचे प्रमाण आहे. या तांदळाची खीर आरोग्यासाठी उत्तम असते.

आरोग्याकरिता अधिक लाभदायक
काळे व लाल तांदूळ शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीकरिता एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तसेच आपल्या आरोग्यासाठीसुद्धा लाभदायक आहे. त्यामुळे या तांदळाचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. या भागातील शेतकऱ्यांनी पॉलिश न करता तांदळाची (बगड) विक्री केल्यास आरोग्याकरिता अधिक लाभदायक ठरू शकतो.
- जी. आर. श्‍यामकुवर,
वरिष्ठ भात पैदासकार, कृषी संशोधन केंद्र साकोली.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com